अहमदनगर : सोलापूरचा (शिरसी, मंगळवेढा) महेंद्र गायकवाड छत्रपती शिवराय केसरीचा किताबाचा मानकरी ठरला. त्याने महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला (पुणे) पराभूत करून सोन्याची गदा पटकावली. मातीच्या आखाड्यात झालेली ही कुस्ती बेमुदत निकाली होती. परंतु शिवराजच्या गुडघ्याला जखम झाल्याने त्याने कुस्तीतून माघार घेतली. परिणामी महेंद्रला तालिम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांनी विजयी घोषित केले.
छबूराव लांडगे क्रीडा नगरीत तीन दिवस सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेला कुस्तीप्रेमींची लक्षणीय हजेरी होती. विजेत्या महेंद्रला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोन्याची गदा प्रदान करण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्वागताध्यक्ष आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, भाजपचे भैया गंधे, सुवेंद्र गांधी, वसंत लोढा, शिवसेनेचे अनिल शिंदे, दिलीप सातपुते, प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर आदी उपस्थित होते.
माती विभागात सिकंदर शेखला महेंद्र गायकवाडने एका गुणाने हरवले. तर गादी विभागात शिवराजने माऊली कोकाटेवर एकतर्फी विजय मिळवला. भाजप व शिवसेनेच्या वतीने प्रथमच मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. गादी विभागात शिवराजने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. त्या पहिल्या दोन मिनिटांतच माऊली कोकाटेवर वर्चस्व मिळवले. भारंदाज मारून तब्बल चार गुणांची कमाई केली. एकूण बारा गुण घेत गदेच्या लढतीसाठी प्रवेश मिळवला. माऊलीला अवघे दोन गुण घेता आले.
सिकंदरसाठी गर्दी
सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात आकर्षणाचा विषय आहे. त्याची कुस्ती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी दूरवरून आले होते. माती विभागात महेंद्रसोबत त्याची लढत झाली. प्रारंभी सिकंदरने आक्रमक होत पहिला गुण घेतला. मध्यंतरापर्यंत एक विरूद्ध शून्य असा गुणफलक होता. सिकंदरने आक्रमक खेळ सुरूच ठेवत पुन्हा दोन गुण घेतले. मात्र, महेंद्रने आक्रमक होत दोन गुण घेतले. गुणांची वरचढ सुरू असताना महेंद्रला पुन्हा दोन गुण मिळाले. तीन विरूद्ध चार असा गुणफलक झाला. तेव्हा २७ सेकंद उरली होती. नंतर मात्र त्याने टाईमपास करीत विजयश्री खेचली.
अशी झाली लढत
सोन्याच्या गदेसाठीची लढत बेमुदत निकाली होती. या लढतीसाठी शिवराज गादी विभागातून तर महेंद्र माती विभागातून आला होता. सुरूवातीला दोघांमध्ये खडाखडी झाली. महेंद्रने घिस्सा डाव मारण्याचा प्रयत्न केला. नंतर शिवराजने त्याला एकचाक मारली. महेंद्रने त्याला खाली खेचले. परंतु पकडीतून शिवराज चपळाईने निसटून गेला. उलट त्याने महेंद्रवर ताबा मिळवला. त्याने भारंदाज डाव मारला. मात्र, ही कुस्ती गुणांवर नसल्याने त्याचा उपयोग झाला नाही.
विश्रांतीसाठी काही काळ कुस्ती थांबली. पुन्हा महेंद्रने आक्रमक खेळ करीत शिवराजला चीत करण्याचा प्रयत्न केला. तो उसळी मारून निसटू लागला मात्र, महेंद्रने त्याला पुन्हा एक चाक मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात शिवराज जखमी झाल्याने कुस्तीस नकार दिला. परिणामी महेंद्रला विजयी घोषित केले. मेघराज कटके व संभाजी निकाळजे या कुस्तीसाठी पंच होते.
दोघे एकाच गुरूचे पठ्ठे
महेंद्र आणि शिवराज दोघेही एकाच वस्तादाचे पठ्ठे आहेत. पुण्याचे अर्जुनवीर काका पवार यांच्या तालमीत ते सराव करतात. त्यांना एकमेकांना कमजोरी आणि बलस्थाने माहिती आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतही याच दोघांची लढत झाली होती. त्यावेळी शिवराजने महेंद्रला हरवून गदा पटकावली होती. आता महेंद्र हा या स्पर्धेत बाहुबली ठरला. स्पर्धेपुर्वी शहरातून मिरवणूक काढली होती. त्यावेळी महेंद्रने ही गदा उंचावली होती. योगायोगाने तोच विजेता ठरला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.