अहमदनगर : काही राजकीय शक्ती वेगवेगळ्या मार्गाने शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, पोलिसांनी कोणत्याही शक्तीच्या दबावाला बळी न पडता अशा मंडळींच्या मुसक्या आवळाव्यात. गुन्हेगारांवर ‘खाकी’चा धाक असायलाच हवा, असे परखड मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
शहरातील अशांतता, वाढती गुंडगिरी, तसेच विकासकामे, राजकारण आदी मुद्द्यांवर जगताप यांनी ‘सकाळ’च्या टीमशी दिलखुलास संवाद साधला. या वेळी त्यांनी सर्वच प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. प्रारंभी ‘सकाळ’चे आवृत्तीप्रमुख प्रकाश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी काय कराल?
या प्रश्नावर ते म्हणाले, की शहरात शांतता व सलोखा राहण्यासाठी कायम प्रयत्न असतो. काही राजकीय विरोधक अनुचित प्रकार घडवून आणतात. पोलिसांनी अशा लोकांवर कारवाई करावी. ज्यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत, त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात यावे. शहराला बदनाम करून काहीही साध्य होणार नाही.
शहराचा तोंडवळा बदलला
शहरात विकासासाठी उद्योग वाढण्याची गरज आहे. त्यासाठी पोषक वातावरण हवे, यासाठी माझा कायम प्रयत्न असतो. गेल्या दहा वर्षांत पाहिले, तर उपनगरे वाढली. लोकवस्ती वाढली. शहर शांत आहे म्हणूनच हे होत आहे.
शहर झपाट्याने विकसित होत असल्याने पुण्याचे बांधकाम व्यावसायिक येथे येत आहेत. ही संख्या वाढत आहे. नगरमध्ये मोठे प्रोजेक्ट होत आहेत. लवकरच शहराचा चेहरामोहरा बदललेला दिसेल. गुन्हेगारी किंवा दंगलीचा शिक्का शहराला मारण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आवाहनही जगताप यांनी केले.
जिल्हा विभाजन महत्त्वाचे नामांतराआधी जिल्ह्याचे विभाजन व्हायला हवे, अशी तुमची भूमिका आहे. त्या विषयी काय सांगाल?
या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, की भौगोलिकदृष्ट्या जिल्हा मोठा आहे. त्यामुळे शासकीय अडचणी अनेक आहेत. नामांतराला कोणाचाही विरोध नाही, मात्र आधी विभाजन व्हायला हवे. कारण, नंतर नावावरून वाद निर्माण होऊ शकतात.
यापूर्वी ठाणे जिल्ह्यातून पालघर वेगळा झाला. त्याच वेळी नगरचे विभाजन होऊ शकले असते. केवळ राजकीय उदासीनतेमुळे विभाजनाचे घोंगडे भिजत पडले आहे.
विमानतळ, मेट्रो हवे !
शहरापासून जवळच असलेल्या बाबुर्डी परिसरात विमानतळ होणार होते. त्याचे सर्वेक्षणही झाले होते; परंतु काही राजकीय नेत्यांनी ते उत्तरेत नेले. केवळ शिर्डीपुरताच त्याचा फायदा होत आहे. ते विमानतळ शहराच्या जवळ झाले असते,
तर औद्योगिक वसाहत वाढली असती. आयटी पार्क, मोठे प्रकल्प नगर शहराजवळ आले असते. भविष्यात विमानतळ, मेट्रो यायला हवी. हे सर्व जिल्ह्याचे विभाजन झाल्याशिवाय होणार नाही, याकडेही संग्राम जगताप यांनी लक्ष वेधले.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
आरोग्यदृष्ट्या आधुनिक सुविधांयुक्त रुग्णालयासाठी २८ कोटी शासनाकडून मिळविले. महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. लवकरच हे काम होऊन आरोग्यसुविधा मिळतील.
नगरसेवकांनो, रस्त्यांचे पालक व्हा!
शहरातील रस्त्यांसाठी सुमारे ५० कोटींचा निधी आणला. महापालिका प्रशासन, नगरसेवकांनी त्याचा विनियोग व्यवस्थित करायला हवा.
मोठ्या रस्त्यांची कामे चांगली झाली. मुख्य शहरातील रस्त्यांबाबत संबंधित नगरसेवकांनी अधिक प्रयत्न करायला हवा. भूमिगत कामे वेगाने व्हावीत. त्यानंतर रस्तेही चांगले होतील. शहरातील पाणीप्रश्न आता सुटत आहे. अमृत योजनेमुळे अनेक प्रभागांत मुबलक पाणी मिळत आहे. ५० वर्षांत लोकसंख्या वाढली; परंतु पाण्याची आवक वाढली नव्हती. आता हा प्रश्न सुटत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.