श्री साईचरित्रातील या पंक्ती भाविकांसाठी प्रमाण. श्री साईबाबांची कीर्ती केवळ देशातच नव्हे, तर परदेशांतही पोचली. अमेरिकेसह अनेक देशांत बाबांची मंदिरे आहेत. शिर्डी असे देवस्थान आहे, की जेथे लाखो भाविक हजेरी लावतात. बाबांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात. ‘सबका मलिक एक’ हा संदेश देणाऱ्या बाबांवर सर्वधर्मीय भक्तांची श्रद्धा आहे.
खरं तर साईबाबांचे नाव घ्यायचे आणि वाद निर्माण करायचे, हा काही पहिला प्रसंग नाही. धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे काही पहिलेच नाहीत. यापूर्वीही हिंदू धर्मातील काही मंडळींनीच त्यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करून वाद ओढवून घेतला होता.
वास्तविक, साईबाबा कोण होते, त्यांनी शिर्डीत काय केले, रंगल्यागांजलेल्यांची कशी सेवा करता येईल, हेच तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळले. आजच्या विज्ञान- तंत्रज्ञानाच्या जगातही अध्यात्माला तितकेच महत्त्व आहे, जितके पूर्वीही होते.
जो कोणी एकदा शिर्डीत येऊन बाबांच्या समाधीची पायरी चढतो, तो पुनःपुन्हा शिर्डीत येतो. ज्याला ज्याला प्रचिती येते, तो बाबांवर विश्वास ठेवतो. बाबांचा कोणताही भक्त कोणती प्रचिती आली हे कदापि सांगत नाही, असे सांगणारे हजारो भक्त भेटतात.
लोकमान्य टिळक, त्यांचे वकील खापर्डे यांच्यापासून ते के. व्ही. रमणींपर्यंत थोर मंडळी बाबांसमोर नतमस्तक झाली. रमणी यांचा सल्ला तर तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता घेत असत. त्याच रमणींनी शंभराहून अधिक कोटी रुपये खर्च करून शिर्डीत साईभक्तांसाठी निवासस्थाने बांधली.
विविध क्षेत्रांतील अशा किती थोर माणसांची नावे घ्यावी लागतील. तशी यादी द्यायची म्हटले तर कागदही अपूर्ण पडेल. द्वारकामाईत बाबांनी स्वत: रामजन्मोत्सव सुरू केला. याच उत्सवाला लाखो लोक येतात.
दर वर्षी शिर्डीत तीन कोटींहून अधिक भाविक हजेरी लावतात. ती का आणि कशासाठी? जगाच्या कानाकोपऱ्यांतून इतक्या लांब शिर्डीत का येतात? किती लोक पायी चालत येतात? हे केवळ बाबांच्या श्रद्धेपोटी होते.
साईभक्तांना कधी एकदा शिर्डीत जातो अन् बाबांचे दर्शन घेतो, समाधीवर डोकं ठेवतो, ही आस लागलेली असते. कोणताही गाजावाजा न करता दानपेटीत कोट्यवधींचं दान पडतं.
कितीतरी उद्योजक, व्यावसायिक आपल्या संपत्तीतील काही वाटा बाबांच्या शिर्डीसाठी बाजूला काढून ठेवतात, याचा विचार वाद घालणाऱ्यांनी थंड डोक्याने करायला हवा.
तिरुपती बालाजी देवस्थानानंतर देशात दुसरा क्रमांक लागतो तो शिर्डी देवस्थानचा. बाबांच्या दानपेटीत दान टाकताना या पैशांचा उपयोग गोरगरिबांना, रंजल्यागांजलेल्यांना होईल, याविषयी भक्तांच्या मनात कधीच शंका नसते. राजकीय, बॉलिवूड असो, नाही तर उद्योजक; बाबांच्या दरबारात आले नाहीत, असे होत नाही. (Latest Marathi News)
हे सर्व सांगण्याचं कारण असं, की बाबांचं नाव घेऊन चर्चेत येण्याचा उद्योग काही मंडळी करतात. कोणी तरी उठतो आणि साईबाबा देव नव्हते म्हणतो. हे दुखावणारं विधान आहे, परंतु बाबांच्या भक्तांची सबुरीवर श्रद्धा आहे.
साईबाबांनी कधीही स्वत:ला देव मानलं नाही. मी संत आहे असंही कधी ते म्हणाले नाहीत. जर बाबांचंच म्हणणं नव्हतं तर तुम्ही का म्हणून गळा काढता?
भक्तांनी त्यांना देवच मानायचं ठरवलं असेल तर तुम्ही देव नव्हते म्हणून भुई बडवण्यात अर्थ तरी काय? संतकवी दासगणू महाराजांनी साईस्तवन मंजिरीमध्ये जे म्हटले आहे, तेही महत्त्वाचे आहे...
संतांची योग्यता भली,
देवाहून आगळी ।
आजादुजास नाही स्थान मुळी
जवळ साधूंच्या ।।
संतांची योग्यता देवाहून श्रेष्ठ आहे, असं त्यामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींनी दासगणूंनी लिहिलेलं बाबांचं चरित्रही थोडं अभ्यासायला हवं.
जर लोकांची साईबाबांवर श्रद्धा असेल, सबुरीवर विश्वास असेल, सब का मलिक एक असे बाबा म्हणत असतील आणि लोकांना ते पटत असेल, जर का भक्तांना बाबा देव आहेत असं वाटत असेल आणि जर कोणी ते देव नव्हते असं म्हणत असेल, तरीही साईभक्तांवर त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.