नगर ः कोरोना लसीकरणाचे काम राज्य सरकारने वेगाने हाती घेतलेले आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर झाल्यानंतर ४५ वर्षां पुढील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मध्यंतरी १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने ते बंद करण्यात आले. आता वयाची तीस वर्षे पूर्ण केलेल्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून (ता. २१) सर्व केंद्रांवर सुरू होणार आहे.
कोरोना लसीकरणाला फ्रंटलाईन वर्करपासून सुरवात झाली. फ्रंटलाईन वर्करांचे लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. ४५ वयाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असतानाच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ लागली.
लसींची टंचाई निर्माण होऊ लागल्याने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहीम थांबविण्यात आलेली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा उरकत आल्यामुळे आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला शनिवारपासून (ता. १९) सुरवात झालेली असली, तरी खऱ्या अर्थाने ही मोहीम सोमवारपासून (ता. २१) जिल्ह्यात सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील १३२ लसीकरण केंद्रांवर सध्या लसीकरण केले जात आहे. आता लसीकरणासाठी पूर्वीसारखी आॅनलाइन नोंदणीची आवश्यकता भासणार नाही. आधार कार्ड घेऊन गेल्यानंतर लसीकरण केंद्रावर नोंदणी होऊन लस घेता येणार आहे. तसा अध्यादेश आता जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील झुंबड कमी होणार आहे.
प्राथमिकबरोबर ग्रामीण रुग्णालयांतही लसीकरण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच ग्रामीण रुग्णालयातही लसीकरण सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबर ग्रामीण रुग्णालयात जाऊनही लस घेणे गरजेचे आहे.
राहाता तालुक्यात कोरोनाचा उद्रेक
राहाता तालुक्यात कोरोनाच्या नवीन रुग्णांचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात सर्वाधिक २०७ रुग्ण आढळून आले आहेत. राहात्यात शनिवारी अवघे १४ रुग्ण होते. रविवारी ही संख्या २०७ पोहचल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. जिल्ह्यात नवीन ५९४ रुग्ण वाढले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या जूनच्या तिसऱ्या आठवड्यात कमी होत होती. बहुतांश तालुक्यांतील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी होती. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये उत्तरेच्या तुलनेत जादा रुग्ण होते. रविवारी रुग्णसंख्येच्या समीकरणात मोठे बदल झाले. राहाता तालुक्यात २०७ रुग्ण आढळून आल्याने पहिल्या क्रमांकावर आला आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्ण संख्येचा आलेख पुन्हा वाढला आहे. संगमनेरमध्ये ५४ रुग्ण आढळून आले. पाथर्डी, श्रीगोंदे व पारनेर हे तालुके रुग्ण संख्येत जिल्ह्यातील पहिल्या पाच तालुक्यांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात आढळून आलेल्या ५९४ रुग्णांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात ७२, खासगी प्रयोगशाळेत ३५४, रॅपिड अँटिजेन चाचणीत १६८ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या दोन लाख ७६ हजार ८२ झाली आहे. सध्या दोन हजार ९५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या ५९५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. आतापर्यंत दोन लाख ६७ हजार ४५७ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८८ टक्के झाले आहे.
तालुकानिहाय रुग्ण याप्रमाणे :
राहाता २०७, संगमनेर ५४, पाथर्डी ४४, श्रीगोंदे ४४ , पारनेर ३९, शेवगाव ३७, राहुरी २८, नगर तालुका २६, श्रीरामपूर २४, अकोले २२, कर्जत १६, कोपरगाव १५, जामखेड १३, नेवासे १२, नगर शहर दहा, भिंगार छावणी परिषद एक तर बाहेरील जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.