अहमदनगर : कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून राज्यातील लाखो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मूळ रा. पाथरवाला, ता. नेवासे, हल्ली रा. पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोमनाथ राऊत याने पत्नी सोनिया राऊत, वंदना पालवे (केडगाव), सुप्रिया आरेकर (बुऱ्हाणनगर), प्रीतम शिंदे (पुणे), प्रीती शिंदे (बालिकाश्रम रस्ता, नगर) आणि शॉलमन गायकवाड (रा. सावेडी) हे संचालक असलेल्या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डिसेंबर २०१९ मध्ये स्थापन केली. त्याअंतर्गत ‘फंड पे’ नावाचे वॉलेट सुरू केले. पतसंस्था, मोबाईल रिचार्ज, टीव्ही चॅनल रिचार्ज, वीजबिल भरणा आदी सेवा देण्यास सुरवात केली. कंपनीमार्फत ऑनलाइन बिल देण्याची सेवा दिली जात होती.
कंपनीमध्ये एक लाख रकमेची गुंतवणूक केल्यानंतर दरमहा तीनशे ते दीड हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. कंपनीचे बॅंक खाते आयसीआयसीआय आणि आरबीएल बॅंकेत उघडण्यात आले होते. गुंतवणूकदारांना या खात्यात ऑनलाइन पैसे भरण्याची सुविधा होती. पाचशे रुपयांपासून ५० लाख रुपये या कंपनीत गुंतविता येत होते. पाचशे ते एक हजार रुपयांची गुंतवणूक करणारे सुमारे साडेचार लाख गुंतवणूकदार आहेत.
या कंपनीने २९ ऑगस्ट २०२१ रोजी सर्व व्यवहार बंद केले. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या अहमदनगर आणि पुणे येथील कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावेळी तांत्रिक अडचण असल्याने कामकाज ठप्प असल्याचे सांगण्यात आले. गुंतवणूकदारांनी वारंवार संपर्क केल्यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.
सतीश बाबूराव खोडवे (रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये गुंतवणूकदारांची सुमारे सात कोटी ६८ लाख ६४ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले होते. या कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ राऊत याच्यासह सात संचालकांवर फसवणूक आणि महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता. आरोपी सोमनाथ हा पत्नीसह गुन्हा दाखल होण्यापूर्वी पसार झाला होता.
आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलिस हवालदार दत्तात्रय जपे, अविनाश वाकचौरे, सूरज वाबळे, शैलेश गोमसाळे यांच्या पथकाने आरोपी राऊत याला अटक करून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.