अकोले : अकोले तालुक्यातील फोफसंडी येथे पर्यटनासाठी गेलेल्या संगमनेर येथील चार पर्यटकांपैकी दोघे जण शुक्रवारी दुपारी फॉल जवळील डोहात मोबाईलवर सेल्फी काढत असताना सटकले व डोहात पडले होते.
दोघेजण बेपत्ता होते, त्यांचे मृतदेह आपत्ती व्यवस्थापन, वन्यजीव विभाग, पोलीस यांनी शनिवारी दुपारी ११ वाजता बाहेर काढले. यावेळी त्यांच्या नातेवाईकांचा दुःखाचा बांध फुटला. अभिजित वरपे (३०), पंकज पाळंदे (३१) असे मृत व्यक्तीची नावे आहेत. (dead Bodies of two missing tourists found in Fopsandi Ahmednagar News)
संगमनेर येथील अभिजित वरपे, पंकज पाळंदे, सिद्धांत वाबळे व सिद्धार्थ वाबळे हे चार तरुण दोन दुचाकीवरून फोपसंडी येथे पर्यटनस्थळ असलेल्या फोपसंडी गावात शुक्रवारी दुपारी दोन वाजता पोहचले.
अभिजित वरपे व पंकज पाळंदे दुपारी साडेतीनच्या सुमारास गावाच्या पश्चिमेला असलेल्या पाणवठ्याच्या ओढ्यात पाण्याचा आनंद घेण्यासाठी उतरले. त्यात पंकज याचा मोबाईल पाण्यात पडल्याने तो मोबाईल शोधताना डोहात पडला.
त्याला पोहता येत नव्हते अभिजित पोहणारा असल्याने तो वाचवण्यासाठी पुढे सरसावला, तर त्याला मिठी मारून तोही डोहात अडकला. मात्र तेथे खोल डोह असल्याने ते बुडू लागले. परिस्थिती पाहता बरोबर असलेल्या दोन मित्रांनी आरडाओरड करत गाव गाठले व गावातील लोक जमा झाले.
सिद्धांत व सिद्धार्थ वाबळे पूर्ण भेदरलेल्या अवस्थेत असल्याने गावकऱ्यांनी धीर देत शोधकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते मात्र तपास लागला नाही. शनिवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु झाले.
अकोले येथील आपत्ती व्यवस्थापन, वन्यजीव विभागाचे अधिकारी, सरपंच सुरेश वळे, चिमाजी ऊंबरे, दत्तू मुठे, वन्यजीवचे परिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांनी सकाळी ११वाजता दोन्ही मृतदेह बाहेर काढले. अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पर्यटकांचा बेफिकिरपणा व प्रशासनाचा दुर्लक्षितपणा
अकोले तालुक्यात मोठ्या संख्येने पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक येतात यात तरुणाईची संख्या अधिक असते. उंच कड्यावरून पडणारे धबधबे पाहून ते हरवून जातात. त्यांना नियंत्रण करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कुणीही नसल्याने ते सेल्फी काढण्यासाठी अवघड व निसरड्या ठिकाणी पोहचतात.
कुठलाही अंदाज नसताना जोखीम पत्करतात व त्यातच ते मृत्यूच्या कवेत जातात. रंधा धबधबा, स्पिलवे, सांदण दरी, हरिसचंद्र गड या ठिकाणी दोन महिन्यात ५ तरुण आपला जीव गमावून बसले. तर एक सर्प दंशाने गेला.
कळसुबाई हरिसचंद्र गड अभयारण्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. येथे जाण्यासाठी रस्ते नाही, वळणे आहेत. फोफसंडी येथे दरडी कोसळतात, सरपटणारे प्राणी त्यात घोणस जातीचे साप अधिक आहेत.
धोकादायक ठिकाणे असूनही कुठेही धोक्याच्या सूचना नाही, मार्गदर्शक नसल्याने तरुण वाटेल तिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. पर्यटकांच्या नोंदी होणे आवश्यक असताना तसे घडताना दिसत नाही.
काही पर्यटक झिंगलेल्या अवस्थेत पाण्यात उतरतात, स्थानिक ग्रामस्थ देखील पोहचणार नाही, असे ठिकाणी जाऊन आपला जीव गमावतात, त्यामुळे भविष्यात प्रशासनाने कडक भूमिका अवलंबने गरजेचे असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
"पर्यटकांनी पाण्याचा अंदाज आल्याशिवाय पाण्यात उतरु नये, सेल्फी काढताना सावधगिरी बाळगावी, स्थानिक मार्गदर्शक असल्याशिवाय कड्यावर अथवा धबधब्यावर जाऊ नये."
- प्रवीण दातरे (स.पो.नि.राजूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.