नगर : पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी अजूनही पुरेसा पाऊस नाही. अनेक भागांत खंड पडल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून, त्याचा परिणाम पोळा सणावर दिसून येत आहे.
त्याचबरोबर राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव पसरत असल्याने अनेक ठिकाणी पोळ्यावर निर्बंध आहेत. लम्पीचा फैलाव रोखावा यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या साहित्य खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पोळ्यानंतर परतीचा पाऊस येतो. मात्र परतीच्या पावसाचीही शाश्वती दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
नगर जिल्ह्यात अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही. बैलपोळ्याला शेतकरी सजावटीचे साहित्य खरेदी करतात. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरसारखी साधने जरी असली तरीही गाई, म्हशी, शेळ्या आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आहेत. या प्राण्यांना का होईना शेतकरी गोंडे, शेंदूर, चवार, हिंगुळ असे साहित्य आपल्या जनावरांना घेऊन जातात. बैलाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुथळे, घुंगरमाळ, पितळी तोडा, मोरखी, झालर, शेंब्या आदी वस्तूंना मागणी आता कमी झाली आहे व त्यानुसार विक्रेतेही कमी झाल्याचे व्यापारी सांगतात.
दुष्काळ असो की नसो मुक्या प्राण्यांना त्याचं काहीही नसते पण आपल्या घरी असलेल्या बैल, गाई, म्हशी यांचा सण त्यांना सजवून त्यांना गोड गोड खाऊ घालूनच साजरा करत असतो तरच मनाला प्रसन्न वाटते, असे प्रगतिशील शेतकरी आसाराम अकोलकर यांनी सांगितले.
बैल कमी झाले असले तरीही शेतकऱ्यांच्या दारात शेळी, गाई, म्हशी आहेत त्यासाठी का होईना शेतकरी साहित्य घेऊन जातात दुष्काळसदृश परिस्थिती होताना दिसत आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे.
- विश्वनाथ जंगम, साहित्य विक्रेते करंजी, ता. पाथर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.