अहमदनगर : जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. जूनमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. परिणामी, उडीद- मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. आठ दिवसांत पेरणी न झाल्यास हा पेरा करता येणार नाही.
जिल्ह्यात सुमारे ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात ही नगदी पिके घेतली जातात. कर्जत, जामखेड, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव हे तालुके खरिपाचे म्हणून ओळखले जातात. हा भाग दुष्काळी असल्याने त्यांची मदार पावसावरच असते.
रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्रातही अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रताही प्रचंड वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे.
शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात केली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. कर्जत, जामखेड तालुक्यांत उडदाचे क्षेत्र मोठे असते. मात्र, पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
टंचाईच्या झळा तीव्र होणार
पावसाळा लांबल्याने जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत. सद्यःस्थितीत पारनेर तालुक्यातील बारा गावांना, संगमनेर तालुक्यात आठ, अकोले तालुक्यातील तीन, तर नगर तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
२७ गावे व १२० वाड्या-वस्त्यांवरील ४९ हजार ग्रामस्थांची तहान टँकर भागवत आहेत. पावसाळा आणखी लांबल्यास टँकरच्या संख्येत वाढ होईल. शेतकरी पावसाच्या भरवशावर उडीद, मूग, तूर, बाजरी, सोयाबीनची पेरणी करतात. मात्र, पाऊस लांबल्याने बियाणे खरेदीसाठी येण्याचे प्रमाण तुरळक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत दुकानदारही पावसाची वाट पाहत आहेत. पाऊस झाला तरच बाजारपेठेत उलाढाल होईल.
-नितीन भोईटे, कृषी सेवा केंद्रचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.