राहुरी, ता. ८ : गुंगीचे औषध देऊन २०१९ मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर २०२३ पर्यंत विविध आमिषे दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे (वय ८२, रा. श्रीरामपूर) यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री १.३५ वाजता श्रीरामपूर येथील राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी राहुरी तालुक्यातील एका महिलेने सोमवारी (ता.७) राहुरी पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली होती.
मुरकुटे यांच्या शेतजमिनीत पीडित महिला काम करीत होती. त्यामुळे दोघांची ओळख झाली. २०१९ मध्ये गुंगीचे औषध देऊन मुरकुटे यांनी जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर घर, शेती घेऊन देतो, मुलाला नोकरी लावून देतो, अशी आमिषे दाखवून नगर जिल्हा, मुंबई आणि दिल्ली येथे २०२३ पर्यंत वेळोवेळी अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोलिस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीरामपूर शहरचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, उपनिरीक्षक समाधान साळुंके, राहुरी व श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यातील पोलिस पथके, महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मुरकुटे यांच्या निवासस्थानी दाखल झाला. त्यानंतर मुरकुटेंना पोलिसांनी ताब्यात घेतले.
सकाळी राहुरी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली. दुपारी त्यांना राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयासमोर शंभरावर चारचाकी वाहनांतून आलेल्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मुरकुटेंनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून व्यवसाय सुरू केला. श्रीरामपूर मतदारसंघाचे ते तीन वेळा आमदार होते.१९८० साली काँग्रेसकडून, १९९० साली जनता दलाकडून; तर १९९५ साली पुन्हा काँग्रेसकडून आमदार झाले. श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याची धुरा गेल्या ३५ वर्षांपासून सांभाळीत आहेत. २००४ साली शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेलेले तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांच्या विरोधात मुरकुटे यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. त्यात मुरकुटेंचा पराभव झाला होता.
आरोपी भानुदास मुरकुटे यांना दुपारी साडेतीन वाजता राहुरी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ॲड. सविता गांधले यांनी पोलीस कोठडी मागितली. आरोपीचे वकील ॲड. सुमित पाटील, ॲड. महेश तवले यांनी अटक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा अर्ज करून जोरदार युक्तिवाद केला. परंतु न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत युक्तिवाद चालला. रात्री दहा वाजता न्यायालयाने आरोपी मुरकुटे यांना येत्या गुरुवार (ता. १०) पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.