शिर्डी (अहमदनगर) : साईसंस्थान रुग्णालयासाठी हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्रकल्प उभारणार असल्याची घोषणा शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली.
तातडीच्या उपचारासाठी बेडचा नाही पत्ता, रेमडेसिव्हिर इंजेक्शन बेपत्ता, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा, जागा न मिळाल्याने रुग्णांच्या वाढत्या हालअपेष्टा, अशा एक ना अनेक अडचणींनी त्रस्त असलेल्या साईसंस्थानच्या कोविड रुग्णालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखर्णा, साईसंस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, साईसंस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात अडीचशेपैकी दीडशे खाटा कोविडसाठी व शंभर खाटा अन्य आजारांच्या उपचारासाठी राखीव राहणार आहेत. जुन्या रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले जाईल. रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू. संस्थानच्या नियोजित ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबत तदर्थ समितीच्या अध्यक्षांसमवेत आपण व जिल्हाधिकारी बोललो आहोत. येत्या आठ दिवसांत या कामाची निविदा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आहे.
आमदार विखे पाटील व खासदार लोखंडे यांनी बैठकीतील चर्चेत सहभाग घेतला. रुग्णालयाच्या विविध अडचणी मांडल्या. यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, साईसंस्थान रुग्णालयाचे डॉ. प्रीतम वडगावे, डॉ. मैथिली पीतांबरे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, भाजपचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, उपाध्यक्ष रमेश गोंदकर, सचिन चौगुले आदी उपस्थित होते. दरम्यान, ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या टंचाईबाबत कुठलाही ठोस निर्णय होता त्यांची ही भेट पार पडली.
प्रत्येक तालुक्यातील आमदारांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आपापल्या तालुक्यात कोविड रुग्णालये तातडीने उभी करावीत. त्यामुळे रुग्णांना तालुक्याच्या बाहेर जावे लागणार नाही, त्यांची फरफट थांबेल. याबाबत पालकमंत्र्यांनी त्यांना सूचना द्याव्यात.
- राधाकृष्ण विखे पाटील, आमदार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.