नीलेश दिवटे
कर्जत :परतीच्या पावसावर मदार असलेल्या कर्जत तालुक्यावर वरुणराजा मेहेरबान झाला. कमी अधिक प्रमाणात सर्वदूर केलेल्या बॅटिंगमुळे तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची साठवण व पातळी वाढल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय ४५ टँकरपैकी ३३ टँकर बंद करण्यात आले आहेत. सध्या तालुक्यात १२ गावांत १० टँकरद्वारे २२ खेपा मंजूर आहेत. कर्जत शहरात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होत नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
कर्जत तालुक्यात नियमित पावसाळ्यात पाऊस पडत नाही. मात्र, परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. हे मागील आकडेवारी सांगते. मात्र, यावेळी बरोबर सात जूनला मृग नक्षत्रात पावसाने मोठ्या दिमाखात तालुक्यात आगमन केले आणि मोठ्या प्रमाणात सर्वदूर पावसाने हजेरी लावली.
गेल्या वर्षी तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील तसेच शहरातील कूपनलिका, विहिरी आणि साठवण बंधारे आटले होते. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत होती. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणून की काय भीमा नदीपात्र कोरडे पडल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी योजना बंद पडली होती.
तालुक्यात काही ठिकाणी वर्षभर टँकरची मागणी होती आणि जानेवारीमध्येच दुष्काळाची चाहूल लागली होती. दुष्काळ उंबरठ्यावर दिसताच शासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या होत्या. एप्रिल मे महिन्यात, तर दाहकता वाढली आणि तालुक्यात ४५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.
या वर्षी जून महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने आज अखेर तालुक्यातील ३३ गावांतील टँकर बंद करण्यात आले असून १२ गावांत १० टँकरने २२ खेपा सुरू आहेत.
बहिरोबावाडी, रेहेकुरी, राक्षसवाडी खुर्द, सोनाळवाडी, तोरकडवाडी, आखोनी, येसवडी, दिघी, निमगाव डाकू, चापडगाव, बेनवडी, करपडी, कापरेवाडी, परीटवाडी, राशीन, पाटेगाव, काळेवाडी, तरडगाव, आळसुंदे, मिरजगाव, थेरगाव, नवसरवाडी, आनंदवाडी, मलठण, बेलगाव, मुळेवाडी, चांदे बुद्रुक, दूरगाव, रवळगाव, सुपे, वालवड, कानगुडवाडी, टाकळी खंडेश्वरी, डिकसळ, चिंचोली काळदात.
चांदे खुर्द, थेटेवाडी, कोंभळी, सितपूर ,खंडाळा, कौंडाणे, खांडवी, गुरव पिंपरी, जळगाव, बाभूळगाव खालसा, निंबोडी, कोकणगाव.
कर्जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ग्रामपंचायत अहवालावरून ३३ गावांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. मात्र, ज्या गावात अद्याप समाधानकारक पाऊस नाही किंवा पाऊस होऊन सुद्धा गावातील पाणीपुरवठा विहिरीला गढूळ पाणी आहे. त्या १२ गावांत १० टँकरने २२ खेपा सुरू आहेत. आगामी काळात गावातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत झाल्यास तेथील टँकर बंद करण्यात येतील.
- प्रकाश पोळ,
गट विकास अधिकारी, कर्जत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.