नगर ः व्यापारी, अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील बड्या मंडळींना व धनिकांना खोट्या प्रेमाच्या मोहजालात अडकवून त्यांची लाखोंची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या "हनी ट्रॅप' टोळीचा "सकाळ'ने पर्दाफाश केला. त्यामुळे टोळीचा मास्टरमाइंड, म्होरक्या, टोळीचा "आत्मा' समजली जाणारी "लैला' व टोळीतील पंटर, या सर्वांनीच मोठा धसका घेतलाय. आता काही दिवस तरी नगर जिल्ह्यात कमी श्रमात जादा पैसा मिळवून देणारा "हनी ट्रॅप'चा धंदा करायचा नाही, असा "ठराव' टोळीच्या गुप्त बैठकीत झाल्याचे वृत्त हाती आले. दरम्यान, आता राज्यभरातील "बकरे' गटविण्याचे टोळीचे मनसुबे असून, त्यादृष्टीने लॉकडाउन उठल्यानंतर "प्लॅनिंग' होणार असल्याचेही समजते.
राज्यभरातच नव्हे, तर जगभरातील मराठी वाचकांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या "हनी ट्रॅप'चे प्रकरण "सकाळ'ने चव्हाट्यावर आणले. स्वतःचे "पर' एकदम "काळे' करीत "हनी ट्रॅप'च्या क्षेत्रात "मुशाफिरी' करीत असलेला टोळीचा मास्टर माइंड "ब्रिगेड'चा स्वयंघोषित "राजा' आणि "भिंगार'चे "दिवे' पाजळीत "सागर'तळ ढवळणारा टोळीचा केडगावनिवासी म्होरक्या यांच्यासह टोळीतील "लैला' यांची नावे सर्वांना चांगलीच उमगली आहेत.
दादा आणि केडगावच्या भाऊची उपाधी
टोळीतील पंटर मंडळींनी मास्टरमाइंड "राजा'ला "दादा'ची, तर म्होरक्याला "भाऊ'ची "उपाधी' बहाल केली आहे. या दोघांच्या नेतृत्वाखाली "हनी ट्रॅप' टोळीच्या समाजविघातक कृत्यांचा "सकाळ'ने पर्दाफाश करताच, मास्टरमाइंड तोंड लपवत परागंदा झाला असून, म्होरक्याचा रक्तदाब खाली-वर होतोय. या दोघांसह टोळीतील मोजक्या "लैलां'च्या मोबाईलवर "विशेष' लक्ष ठेवण्यात येत असल्याची कुणकुण टोळीला लागली आहे. त्यामुळे तिऱ्हाईत मंडळींच्या मोबाईलवरून एकमेकांशी संवाद साधून त्यांचे पुढील "प्लॅनिंग' सुरू असल्याचे सांगण्यात येते.
व्हिडिअो तयार करून ब्लॅकमेलिंग
"सकाळ'ने "हनी ट्रॅप'चे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्यभरातून अनेकांनी "सकाळ'शी संवाद साधत "आपबीती' सांगितली. टोळीतील मास्टरमाइंड, म्होरक्या, मामी, लैला आणि पंटरांनी आपल्याला कसे जाळ्यात ओढले, आपण त्याला कसे बळी पडलो, आपला कसा "व्हिडिओ' तयार केला, नंतर आपल्याकडून कशी रक्कम मागण्यात आली, घरातील "मोडतोड' करून आपण ती रक्कम कशी दिली, याच्या अनेक सुरस कहाण्या त्यांनी कथन केल्या. अनेकांनी, कशा पद्धतीने टोळीने लोकांवर अत्याचार केले, किती मालमत्ता जमविली, दर सहा महिन्यांनी गाड्या बदलत कशी चैनबाजी केली, एकाच गाडीला चार-चार वेगवेगळ्या नंबर प्लेट लावून कशा पद्धतीने "उद्योग' केले गेले, याचीही माहिती पुरविली.
जिस थाली में...
टोळीतील सदस्यांच्या व्यक्तिगत चारित्र्याची सखोल माहितीही दिली. "जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं' अशा शब्दांत टोळीचा मास्टरमाइंड व म्होरक्यासह संबंधितांची "व्यक्तिगत' माहिती देण्यात आली. त्यावर "सकाळ'ने पुढाकार घेत, आता "हनी ट्रॅप' प्रकरणातील विविध पुराव्यांची साखळी जोडण्याचे काम सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत ही साखळी पूर्ण होऊन टोळीवर कारवाई करण्यात यश मिळेल, अशी खात्री आहे.
"त्या' "लैलां'कडून होतेय "मजनू'ची खास चौकशी
बहुचर्चित "हनी ट्रॅप'चे प्रकरण "सकाळ'ने चव्हाट्यावर आणल्यापासून टोळीतील स्वयंघोषित "प्लॅनिंग मास्टर' महिला खूप अस्वस्थ आहेत. म्होरक्या "भाऊ'चे काहीही झाले तरी चालेल; परंतु आपल्या "खास' असलेल्या टोळीच्या मास्टरमाइंड "दादा'ला मात्र धक्का लागता कामा नये, यासाठी "त्या' संबंधित महिला जिवाचा आटापिटा करीत आहेत. चक्क "लैला-मजनू'सारखी असलेली त्यांची वागणूक टोळीतील पंटरांनाही कायम खटकत राहिली.
दादा ओके आहात ना..
टोळीच्या बैठकीतही हे "लैला-मजनू' वेगळ्याच टेबलवर तासन् तास बसायचे. आता मात्र "त्या' महिला वरकरणी "दादा' दोषी असतील, तर गुंतलेच पाहिजेत, अशी भूमिका मांडीत, "ती मी नव्हेच' असे भासविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. तथापि, "आतून' मात्र त्यांना आपल्या "दादां'ची काळजी रात्रन् दिवस सतावते. साहजिकच, "त्यांची' झोप उडाली आहे. "दादां'शी फोनवर तर बोलण्याची तीव्र इच्छा; परंतु "कनेक्शन' सिद्ध होण्याचा धोका नको, म्हणून "त्या' टोळीतील पंटरांमार्फत "दादा ओके आहेत ना, त्यांचे फोन ऑब्झर्व्हेशनला असतील, दादांचे व माझे कॉल डिटेल्स काढले जात आहेत,' अशी खबरही "दादां'ना देत असतात. "दादां'चे काही "खास' मित्रही आता यंत्रणेच्या रडारवर आहेत. त्यांचाही "लेखाजोखा' मांडण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.