संगमनेर (जि. नगर) : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात संगमनेर शहर व तालुक्यातील राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मोठे योगदान दिले. जंगल सत्याग्रह, गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह, स्वदेशी चळवळ, झेंडा सत्याग्रह, छोडो भारत आंदोलन, अशा अनेक राष्ट्रीय चळवळींत संगमनेरच्या मंडळींचे मोठे योगदान होते. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची आठवण जपणाऱ्या नेहरू चौकातील अशोक स्तंभाची पायाभरणी १५ ऑगस्ट १९४७ रोजी झाली होती.
संगमनेरच्या विविध विषयांवरील दुर्मिळ आठवणी संगमनेर इतिहास संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संतोष खेडलेकर यांनी ग्रंथाच्या रूपाने जतन केल्या आहेत. त्यातून तत्कालीन संदर्भांसह त्यांनी जमवलेली माहिती नव्या पिढीसाठी निश्चित अभिमानास्पद आहे. देशाला स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेल्या शहरातील नागरिकांमध्ये उत्साहाची लाट पसरली होती. १४ ऑगस्ट १९४७च्या सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून आनंदोत्सव साजरा करीत, भारत माता, महात्मा गांधींचा जयजयकार करीत मिरवणूक काढण्यात आली. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री कचेरीसमोर प्रथमच तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. सकाळी सर्वच शाळांमध्ये झेंडावंदन करून विद्यार्थ्यांना लाडू वाटण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी सकाळी काँग्रेसच्या वतीने होणाऱ्या ध्वजवंदनासाठी नागरिकांनी सडा- रांगोळ्या घातल्या होत्या. सकाळी सहा वाजता नेहरू चौकात गर्दी जमण्यास सुरवात झाली होती. तालुका काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष भैयासाहेब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या ठिकाणी २३ फूट उंचीच्या व राजमुद्रा असलेल्या स्तंभाची कोनशिला मुरलीधर जयराम मालपाणी यांच्या हस्ते बसविण्यात आली. एक वर्षानंतर नामदार हरिभाऊ पाटसकर यांच्या हस्ते स्तंभाचे लोकार्पण झाले.
जुन्या संगमनेरातील बहुतेक सर्व चौक स्वातंत्र्यसेनानींच्या नावाने असल्याचे अतिशय दुर्मिळ उदाहरण संगमनेरला पाहायला मिळते. चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, गांधी चौक, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, लालाजी चौक, जय भारत चौक ही सर्व नावे देशाशी निगडित आहेत.
- डॉ. संतोष खेडलेकर (कार्याध्यक्ष, संगमनेर इतिहास संशोधन मंडळ)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.