क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर सर्वांत मोठा आहे. गुन्हेगारीतही आव्हानात्मक आहे. त्यामुळे गुन्हेगार योजना याच जिल्ह्यापासून सुरु करत आहोत. त्यानंतर विभागातील पाचही जिल्ह्यांत राबविली जाईल. राजकीयदृष्टया हा जिल्हा संवेदशील असला तरी कोणताही राजकीय हस्तक्षेप होत नाही. असे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सांगितले. 'सकाळ' शी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला.
सुनील गर्जे , नेवासे
प्रश्न : आतापर्यंतच्या कारकिर्दीत कोणता जिल्हा गुन्हेगारीत आव्हानात्मक वाटला?
उत्तर- आव्हानात्मक जिल्हा तसा नगर जिल्हाच आहे. याच जिल्ह्यात अधिक क्राईम रेट आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होतात. अहमदनगरची भौगोलिक पार्श्वभूमी खूप वेगळी असून, आठ जिल्ह्यांची सीमा आहे.
प्रश्न : राजकीय हस्तक्षेप होतो का?
उत्तर- अहमदनगर जिल्ह्यात तसा राजकीय हस्तक्षेप नाही. मला तरी कोणत्या पुढाऱ्याने फोन करून गुन्ह्याबाबत सांगितल्याचे आठवत नाही. काहीतरी घटना घडली आणि त्याबाबत पहा एवढ्यापर्यंत सांगतात. मात्र, गुन्ह्याबाबत कोणताही हस्तक्षेप होत नाही.
प्रश्न : अहमदनगर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या बीमोडासाठी कोणत्या उपाययोजना राबविणार आहात?
उत्तर- मी याआधी नगर जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यावेळी आम्ही दत्तक गुन्हेगार योजना राबविली. ती पुन्हा एकदा आम्ही नगर जिल्ह्यातून सुरू करीत आहोत. विभागातील पाचही जिल्ह्यांत ती योजना आम्ही राबवत आहोत. एका पोलिस अंमलदाराला दोन गुन्हेगार दत्तक दिले जातील. परिस्थितीने गुन्हेगार झाले आहेत, परंतु त्यांचा उद्देश गुन्हेगारीचा नाही; एखाद् दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालाय अशा तरुण वर्गाला वाचविण्यासाठी किंवा मानसिक परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. जे सराईत आहेत, त्यांच्या सुधारण्याचे प्रमाण कमी असते किंवा ते काही ठिकाणी अशक्य असते. मात्र, जे नवीन आहेत, ज्यांच्या सुधारणेची शक्यता अधिक आहे, त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे.
प्रश्न: तुम्ही उत्कृष्ट लेखकही आहात, त्या प्रवासाविषयी काय सांगाल?
उत्तर - समाजात जे अनुभव येतात, ते शब्दबद्ध करणे गरजेचे आहे. पोलिस अधिकारी म्हणून समाजातील अनेक प्रसंग टिपले. महाविद्यालयीन जीवनापासून मी लिहीत आहे. मी लिहिलेले ‘शोध, प्रतिशोध’ हे सत्य घटनांवर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. ‘सत्याचा शोध’ हे शोधासंबंधित पुस्तकही येत आहे. पोलिसांचे कर्तव्य व अधिकार, पोलिस खात्यात काय काम चालते, यावर आधारित आहे. रांजणी नावाचा कथासंग्रहही येत आहे. इतिहासावरही पुस्तक लिहीत आहे. मिळेल त्या वेळेत मी पुस्तकांसाठी लेखन करतो. पोलिस खात्यात अनेक लेखक आहेत. त्यांना एकत्र करून साहित्य संमेलन घेण्याचा विचार आहे.
प्रश्न: हल्ली सायबर क्राईम वाढत आहे, ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?
उत्तर - सायबर क्राईम वाढत आहे. त्याबाबत काळजी घेतली, तर ते बंद होऊ शकते. त्यासाठी लोकांची जागृती होणे गरजेचे आहे. यात बहुतांश म्हणजे, 90 ते 95 टक्के गुन्हेगार झारखंड, राजस्थानमधील आहेत. त्यांच्याकडून प्रॉपर्टी मिळविणे अवघड जाते.
प्रश्न : वृक्षलागवडीसह अन्य उपक्रम आपल्या विभागात राबविणार का?
उत्तर - मागील दोन वर्षांत पोलिस खात्याने राज्यभरात सात लाख वृक्ष लावले. एसआरपी कॅम्पमध्ये झाडे लावली. वृक्षप्रेमी, समाजसुधारक, काही संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबवला. शाळा- महाविद्यालयांत आम्ही उपक्रम राबविले.
प्रश्न : स्पर्धा परीक्षांकडे तरुण वर्ग वळतोय, त्यांना काय संदेश द्याल?
उत्तर - स्पर्धा परीक्षांकडे तरुण वळतात ही चांगली बाब आहे. मात्र, येथे कठीण अभ्यासाशिवाय पर्याय नाही. काम केले तरच तुम्हाला यश. कामाशिवाय समाधान नाही. जास्तीत जास्त नॉलेज आत्मसात केले पाहिजे. वेगवेगळ्या बाबींचा विचार करून तुम्ही अभ्यास केला, तर नक्कीच यशस्वी होता येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.