- संतराम सूळ
जामखेड : घरच्या हलाखीच्या परिस्थितीतही मुलांना शिकवण्याच्या जिद्दीतून ऊसतोड मजुराने आपल्या मुलाला पोलिस उपनिरीक्षक केले आहे. इयत्ता पहिलीपासून आश्रमशाळेत शिकलेला भाऊसाहेब गोपाळघरे राज्यात १५१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक बनला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्ड्यापासून तीन किलोमीटर अंतरावरील नागोबाची वाडी म्हणजे तालुक्यातील सर्वाधिक अतिदुर्गम भाग मानला जातो. बालाघाटाच्या कुशीत असलेल्या नागोबाची वाडी परिसरातील बहुतांश जमीन जिरायती.
त्यामुळे शेतीपासून उत्पन्नाचा शाश्वत स्रोत नसल्यासारखाच. अशा परिस्थितीत बलभीम गोपाळघरे यांना उपजीविकेसाठी ऊसतोडणीशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. दरम्यान, मुलांच्या शिक्षणाची परवड होऊ नये म्हणून बलभीम गोपाळघरे यांनी आपला मोठा मुलगा भाऊसाहेबला आश्रमशाळेत शिकवले.
पहिली ते चौथीचे शिक्षण उंबरे (ता. पंढरपूर) येथे, तर माध्यमिक पाचवी ते नववीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील राजाराम भोसले निवासी आश्रमशाळेत केले. दहावी ते बारावीचे शिक्षण खर्डा येथील रयत शिक्षण संस्थेच्या खर्डा इंग्लिश स्कूलमध्ये झाले.
याच आश्रमशाळेत भाऊसाहेब यांचे नववीपर्यंतचे शिक्षण झाले. भाऊसाहेबचा लहान भाऊ रोहिदास हाही याच आश्रमशाळेत शिकला. पुढे दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण खर्डा येथे खर्डा इंग्लिश स्कूलमध्ये घेतल्यानंतर पुढे बीएस्सी ॲग्रीची पदवी पुणे येथील कृषी महाविद्यालयातून सन २०१५ ला मिळवली.
त्यानंतर भाऊसाहेब याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास राहुरी विद्यापीठात सुरू केला. या ठिकाणी तब्बल सहा वर्षे भाऊसाहेब याने अभ्यास केला. यादरम्यान दिलेल्या स्पर्धा परीक्षेत तीन वेळा अपयश आले. मात्र, निराश न होता अभ्यासात सातत्य ठेवून भाऊसाहेबने मोठ्या जिद्दीने चौथ्या प्रयत्नात यश मिळवले.
आजही छपराचेच घर
घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यातच शिक्षणाचा खर्च. त्यामुळे आजपर्यंत भाऊसाहेबच्या आई-वडिलांना पक्के घर बांधता आलेले नाही. त्यामुळे आजही त्याच्या छपराच्या घरातच भाऊसाहेबाचे कुटुंब गुजराण करत आहे. पोलिस उपनिरीक्षक झाल्याचा आनंदोत्सव याच लहानशा झोपडीत गोपाळघरे कुटुंबाने साजरा केला.
लहान भावाने मजुरी करून मोठ्याला शिकवले
भाऊसाहेबचा लहान भाऊ रोहिदासला घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले, मात्र रोहिदासने आपल्या आई-वडिलांना कामात मदत करत, स्वतः मजुरीने मिळेल ते काम करत, भाऊसाहेबला शिक्षणासाठी पैसे पुरवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.