अकोले - कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात एक हजार ३ वन्यप्राणी आढळून आले. विविध प्रकारचे १ हजार ४५२ पक्षी आढळले. या गणनेत रानगवा अन् निलगाय आढळून आली. २३ व २४ मे या दोन दिवसांच्या कालावधीत ही वन्यप्राणी गणना करण्यात आली.
भंडारदरा विभागातील कोळटेभे, रतनवाडी, घाटघर, साम्रद, शिंगणवडी, पांजरे, उडदावणे येथील जंगलातील आठ पाणवठ्यावर, राजूर विभागातील शिरपुंजे, कुमशेत, पाचनई, अंबित, लव्हाळी, ओतूर, पळसुंदे व कोथळे येथील १७ पाणवठ्यावर ही गणना करण्यात आली. अभयारण्य क्षेत्रात रानगव्याकरिता पोषक अधिवास उपलब्ध झाला आहे.
अभयारण्यामधील इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी या भागात चारादेखील चांगला वाढला आहे. साम्रद, रतनवाडी, पांजरे भागात बेर या स्थानिक गवताच्या प्रजातीसह पवण्या, मारवेल या गवताच्या प्रजातीचीही लागवड वन्यजीव विभागाने केली आहे. पावसाळ्यात गवत वाढले आहे. अभयारण्यात रानगव्यासाठी चारा व उत्तम निवारा तयार झाला आहे.
त्यामुळे रानगवा या भागात आता कधीपर्यंत मुक्काम ठोकतो, याकडे भंडारदरा राजूर वनपरिक्षेत्रातील वन्यजीव विभागाच्या वन अधिकायांसह कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक वन्यजीव भंडारदरा परिसरातील न्हाणी फॉल क्षेत्रात १०७ व हरिश्चंद्रगड विभागातील कळकीचा फॉल ७९ येथे वन्यजीव सापडले.
बिबटे, सांबर, भेकर व रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय ससा, वानर, माकड, कोल्हे यांचाही अधिवास आढळून आला. होले, पारवे, रानकोंबडी, पाणकोंबडी, साळुंकी, धोबी, कोतवाल, कुंभरकुकडा, वटवाघूळ, रानकोंबडा, चंचूक, धोबी, खंड्या असे विविध पक्षी आढळले.
वन्यजीव याची नुकतीच शिरगणती झाली. अभयारण्य क्षेत्रातील भंडारदरा रेंजमधील सर्व सरपंच, पदाधिकारी तसेच तंबू कॅम्पेनिंग करणारे युवक यांची संयुक्त बैठक घेतली आहे. रानगव्याबाबत त्यांना कल्पना देण्यात आली आहे. हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. रानगवा अभयारण्यात येणे, हे शुभवर्तमान आहे. नीलगाय व गवा कोणालाही दिसल्यास त्याला कुठलाही त्रास देऊ नये
- दत्तात्रय पडवळ, वनसंरक्षक, वन्यजीव विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.