Ahmednagar News : भाजपवाल्यांनो, शहराचा आमदार करून दाखवा!

लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे काही महिन्यात बदललेली दिसतील.
Political Leaders
Political Leaderssakal
Updated on

अहमदनगर - लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता शहरासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे काही महिन्यात बदललेली दिसतील. कोण कोठे असेल, हे यशावकाश कळेलही पण, शहरातील भाजपवाले २०१४ चा अपवाद वगळता कधी ताकदीने कोणाविरोधात लढले आहेत, असे चित्र पाहण्यासच मिळाले नाही.

इकडे विखे पाटील आणि तिकडे बीडमध्ये ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. दोन्हीकडील पराभव भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धक्का देऊन गेला. मुंडे यांनी कडवी झुंज दिली. मात्र, पराभवाला सामोरे जावे लागले. राजकारणात जयपराजय होत असतात. असो.

मुंडे यांचा पराभव जिव्हारी लागलेले येथील ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी नगर शहरातून मुंडे यांनी आगामी विधानसभेची निवडणूक लढवावी, अशी थेट मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली आहे. या मागणीने तर समस्त नगरकरांना आश्‍चर्य वाटले असेल. जर शहरात भाजपला इतके पोषक वातावरण आहे, तर भाजपचा स्थानिक एकही नेता लढण्यास का धजावत नाहीत? तुमच्यात लढण्याची धमक नाही का?

आम्ही येथून लढू, विजयश्री खेचून आणू, असे वचन पक्षश्रेष्ठींना का देत नाहीत? आजपर्यंत येथून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचा आमदार बनला. शिवसेनेचे अनिलभय्या राठोड आमदार असल्याने भाजपला युतीचा धर्म पाळावा लागला, हे बरोबर आहे, पण २०१४ मध्ये राज्यात भाजपचे सरकार होते. त्यानंतर पुन्हा सत्ता आली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व घेतलेले आहे. भाजपची फौज त्यांच्यामागे असताना लोकसभेला जिल्ह्यात दोन्हीकडे महायुतीचे उमेदवार पराभूत कसे काय होतात? याचे आत्मपरीक्षण खरे, तर भाजपवाल्यांनी करायला हवे.

स्वातंत्र्यानंतर नगर शहरात भाजपचा आमदार झालाच नाही, हे शल्य बहुदा भाजपवाल्यांना असावे. पण, जिंकायचे असेल, तर हिम्मत दाखवावी लागते. लढावे लागते. येथे कोणतीही मोठी शक्ती असो भाजप लढणारच, असे आव्हान एखाद्या भाजप नेत्याने दिल्याचेही आठवत नाही. नीलेश लंके यांनी जसे करून दाखविले तसे तुम्ही कधीतरी शड्डू ठोकून दाखवा! पंकजा मुंडे या लढवय्या नेत्या आहेत. त्या डगमगणाऱ्यांमधील नाहीत. पक्षाने संधी दिली, तर त्या लढतीलही मात्र, आम्ही येथील भूमिपूत्र आहोत. आम्ही भाजपला जिंकून दाखवू, असे का सांगत नाही.

जगतापांविरोधात लढून दाखवा

संग्राम जगताप हे गेल्या दहा वर्षांपासून आमदार आहेत. त्यांच्याभोवती पिंगा घालण्याऐवजी लढण्याची धमक भाजपवाल्यांनी दाखविली पाहिजे. भाजपवाले ती हिम्मत का दाखवित नाहीत? आज कोणी काहीही म्हणो जगताप यांचीच या शहरावर मजबूत पकड आहे. कालच्या निवडणुकीतील आकडेवारी पाहिली, तर डॉ. सुजय विखे पाटील यांना १०५८४९ तर नीलेश लंके यांना ७४२६३ मते मिळाली. शहरात ३१५८६ मतांचे लीड विखे यांना आहे.

मताधिक्याचा हा आकडा पाहून जर भाजपला असे वाटत असेल की येथे भाजपला पोषक वातावरण आहे, तर ते चुकीचे आहे. येथे जगताप यांच्या मतांचाही विचार करावा लागेल. आज जगताप महायुतीत आहेत, जर भविष्यात महायुती झाल, तर ही जागा राष्ट्रवादीलाच मिळणार आहे. जर तसे झाले नाही, तर भाजप स्वबळावर येथे लढू शकतो.

भाजपचे स्वबळाचे अपयश

यापूर्वी म्हणजे २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर येथून अनिलभैया राठोड (शिवसेना), अभय आगरकर (भाजप) आणि संग्राम जगताप (राष्ट्रवादी) लढले होते. युतीची मते विभागल्याने येथे जगताप यांचा विजय झाला. त्यावेळी जगताप यांना ४९००६, राठोड यांना ४५७४९ आणि आगरकर यांना ३९६७४ मते मिळाली. ही आकडेवारी पाहता भाजपला विजयी व्हायचे असेल, तर कोणाशी तरी युती करावी लागणारच.

जर सगळे स्वबळावर लढले, तरच भाजप खरेच विजय मिळवेल का? हाही प्रश्‍न आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने एकदातरी स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढून पक्षाची किती ताकद आहे हे एकदा नगरकरांना आणि पक्षश्रेष्ठींना दाखवून द्यावे. जर पोषक वातावरण आहे, तर येथे मुंडेच काय खुद्द आगरकरही आमदार होऊ शकतात.

थयथयाट कशासाठी!

डॉ. सुजय विखे पाटील हे नगर जिल्ह्याचेच भूमिपूत्र आहेत. त्यांनी उत्तरेऐवजी दक्षिणेतून निवडणूक लढविली, तर त्यांच्याविरोधात अपप्रचार केला गेला. ते आयात उमेदवार आहेत, असा थयथयाट केला. त्यांना लक्ष्य केले. हे लक्ष्य करणारे भाजपवाले असतील -नसतीलही. पण, जर हा मुद्दा असेल, तर विधानसभेला आयात उमेदवार का बोलवता?.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.