अहमदनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आता शिक्षकांकडून वसूल केले जाणार आहे. तसा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्वउच्चमाध्यमिक इयत्ता पाचवी व पूर्वमाध्यमिक (इयत्ता आठवी) यांची शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्टला झाली. या परीक्षेला जिल्हा परिषद शाळांतील इयत्ता पाचवीचे एक हजार ८५४, तर आठवीचे २७२ विद्यार्थी गैरहजर होते. या शिष्यवृत्तीची फी व शाळासंलग्नता शुल्क जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून भरले जाते. त्यामुळे शाळेतील अनुपस्थित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क संबंधित शिक्षकांकडून वसूल करून ते जिल्हा परिषदेच्या खात्यात वर्ग करण्यात यावे, असा आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे यांनी जारी केला आहे. हा आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
१०० टक्के विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेला बसावे म्हणून अनुपस्थित विद्यार्थ्यांच्या शुल्काची वसुली सुरू करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हा नियम करण्यात आला असला, तरी या वर्षी कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी अनुपस्थित होते. ही बाब प्रशासनाने लक्षात घेऊन वसुलीचा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे.
मागील वर्षीपासून अनुपस्थित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क वसूल करण्यात येत आहे. विद्यार्थी परीक्षेस उपस्थित राहावे, हा एक चांगला उद्देश यामागे आहे.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग
मागील वर्षात २८ हजारांची वसुली
मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेस जिल्हा परिषद शाळांतील पाचवीचे ७५९ व आठवीचे ११५, असे एकूण ८७४ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यापोटी पाचवीसाठी २३ हजार ८६०, तर आठवीसाठी चार हजार २२० रुपये मागील वर्षी वसूल करण्यात आल्याची माहिती समाजमाध्यमावर फिरत होती.
चालू वर्षातील शुल्कवसुली
या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्हा परिषदेत शाळांतील इयत्ता पाचवीचे एक हजार ८५४, तर आठवीचे २७२, असे एकूण दोन हजार १२६ विद्यार्थी गैरहजर होते. त्यापोटी शिक्षकांना आता पाचवीसाठी ७३ हजार ३६०, तर आठवीसाठी दहा हजार ७८० रुपये भरण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.