संगमनेर (जि. नगर) : आश्वी व परिसरातील गावांमधील विकास प्रक्रिया राबवितांना पायाभूत सुविधांना प्राधान्य दिल्याने या भागातील रस्ते विकासाला गती मिळाली. या कामांमध्ये राजकारण आडवे येवू दिले नाही. दळणवळणासाठी महत्वाचा असलेल्या उंबरी बाळापूर ते शेडगाव दरम्यान प्रवरा नदीवरील पुलाचा लाभ ग्रामस्थांसह सर्व पक्षांना होणार असल्याची कोपरखळी भाजपाचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावली. नाबार्ड अंतर्गतच्या निधीतून तालुक्यातील दोन गावांना जोडणाऱ्या साडेसहा कोटी रुपयांच्या मोठ्या पुलाच्या तसेच मतमाऊली सभामंडपाच्या कामाच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रामभाऊ भुसाळ होते.
विरोधाकांचे नाव न घेता शाब्दिक कोट्या करीत टीका करताना ते म्हणाले, या गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्याप्रमाणे ना लिप्ट योजना बंद झाल्या ना उसाचे क्षेत्र कमी झाले. मात्र या भागातील रस्त्याची दैन्यावस्था संपली. या भागातील सहावा पुल मार्गी लागत असल्याचे मोठे समाधान मिळाले. यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचेही सहकार्य मिळाल्याचा आवर्जून उल्लेख केला.
या पुलामुळे उंबरी बाळापूर ते शेडगांव या दोन गावांसह अंभोरे, मालूंजे, पानोडी, शिबलापूर माळेवाडी, पिंपरणे, कनोली, कनकापूर, ओझर बुद्रूक या गावांनाही लाभ होणार आहे. विकासाच्या रस्त्यांना राजकीय अभिनिवेश नसतो. त्याच पध्दतीने या पुलाचा लाभ भाजपासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही होणार आहे. राजकारणामध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे लागते, काहीजन फक्त त्यांच्या राजकीय स्वार्थाकरीता येतात. पण दायित्व मात्र स्विकारीत नाहीत असा टोला त्यांनी लगावला.
या वेळी अॅड. रोहिणी निघुते, दिपाली डेंगळे, निवृत्ती सांगळे, कैलास तांबे, डॉ. दिनकर गायकवाड, भगवानराव इलग, सरुनाथ उंबरकर, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, कांचन मांढरे, नारायणराव कहार, सरपंच संदिप घुगे, सरपंच अरुण भूसाळ, सचिन शिंदे आदि उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.