नगर ः व्यापारी, अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रांतील मंडळींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, ब्लॅकमेलिंग करीत लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीचा गेले तीन दिवस "सकाळ'ने पर्दाफाश चालविला आहे. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली असून, या प्रकरणाची चवीने चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे "हनी ट्रॅप' टोळीचा मास्टर माईंड, म्होरक्या, टोळीचा "आत्मा' असलेल्या "लैला' व इतर पंटर परागंदा झाले आहेत. सरकारने या गंभीर प्रकरणाची युद्धपातळीवर दखल घेऊन संबंधितांना जेरबंद करावे, अशी मागणी विविध संस्था व संघटनांनी केली आहे.
"सकाळ'मधील वृत्तमालिकेद्वारे गेले तीन दिवस "हनी ट्रॅप'चा पर्दाफाश होत आहे. "हनी ट्रॅप'ची पद्धत, त्यात सहभागी असलेल्या महिला, या टोळीचा मास्टर माईंड, म्होरक्या, टोळीची मुख्य "नायिका' असलेली "मामी' व पंटर मंडळी याबाबतची विस्तृत माहिती राज्यभरातील वाचकांना मिळाली. "सकाळ'बरोबरच "सरकारनामा' व "ई-सकाळ'च्या माध्यमातून ही माहिती जगभर पोचली. साहजिकच जगभरातून "सकाळ'च्या निर्भीड पत्रकारितेचे कौतुक झाले.
हेही वाचा - रतन खत्री असे झाले मटका किंग
नावांबाबत रंगतेय चर्चा अन् गप्पाष्टकही
"हनी ट्रॅप'मधील नावांबाबत गेले तीन दिवस चर्चा झडत आहे. "मामी'चे आकर्षण सर्वाधिक मंडळींना असल्याचे दिसून आहे. त्या खालोखाल म्होरक्या व मास्टर माईंडची नावे तर सर्वांनाच मुखोद्गत झाली आहेत. टोळीतील "लैला' व त्यांची कृत्ये अनेकांना माहिती असल्याने त्याबाबतही बरीच चर्चा होत आहे. सध्या ही मंडळी परागंदा झाली असून, "मध्यस्था'च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती हाती आली आहे.
जिल्ह्यातील मंडळींना बाहेरची मंडळी "तुमच्या जिल्ह्यात हे काय चाललंय?' अशी विचारणा करतात. महसूल, पोलिस खात्यासह विविध खात्यांमधील अधिकाऱ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीच्या "अभिनव' उपक्रमाची "महती' समजते. त्यानंतर अनेकांमध्ये त्याबाबतचे "गप्पाष्टक' रंगते. विविध "ग्रुप'वरही त्याबाबत चविष्ट चर्चा होत आहेत. अनेक अधिकाऱ्यांना नगर जिल्हा सध्या "जोरात' आहे, अशा उपरोधिक शब्दांना सामोरे जावे लागत आहे. अर्थात त्याचा आनंदही ही मंडळी घेत आहेत.
"मामी'च्या अनेक भानगडी चव्हाट्यावर
पोलिसांनीही या प्रकरणाची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. मुळात टोळीतील अनेकांचे "उद्योग' पोलिसांना माहीत आहेतच. त्याचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. "मामी' व तिच्या नवऱ्याच्या अनेक भानगडी समोर येत आहेत. नगर तालुक्यातील एका गावात एका बालकाचा नरबळी देण्याचा प्रयत्न या जोडप्याने केला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी पिटाई केल्यानंतर "मामी'चा मुक्काम काही दिवस पुण्यात हलला होता.
अलीकडच्या काळात त्यांनी पुन्हा केडगाव गाठले. तेथे आलिशान बंगला व महागड्या गाड्या हे त्यांचे आकर्षण ठरले. पैशांचा पाऊस पाडणे, अर्थप्राप्तीसाठी कासव व दोन तोंडाचे मांडूळ मिळवून देणे, घरातील "देव्हाऱ्या'तून अनेकांना गंडादोरा करून देणे व त्याद्वारे "हनी ट्रॅप'साठी बकरे मिळविणे ही कामे मामी व तिचा नवरा प्राधान्याने करीत असल्याचे समोर आले आहे.
"देव'माणूस "दत्त' म्हणून झाला भामटा
या टोळीचा बकरा ठरलेला "देव'माणूस "दत्त' म्हणून आता भामटा झाला आहे. आपल्या "पाऊल'खुणांनी त्याने आता टोळीला गेलेल्या लाखो रुपयांच्या "रिकव्हरी'साठी टोळीलाच बकरे देण्याची मोहीम सुरू केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता घरातील "विनय'शीलता व "विनीत'वृत्तीनेही त्याच्या या "कुबेर'बुद्धीसमोर हात टेकल्याचे सांगण्यात येते. असे पुत्र झाले तेव्हाच "देवाघरी' गेले असते, तर इतक्या चांगल्या परिवाराच्या "नाथां'च्या मागे हा कलंक राहिला नसता, अशी भावनाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, "देव'माणसाने सध्या तरी ठरावीक महिलांच्या घरात "दत्त' म्हणून प्रवेश करून त्यांच्या डोक्यावरून हात फिरविण्याचा सपाटा सध्या तरी थांबविला आहे. परंतु ही सवय त्याच्या नसानसांत भिनली असल्याने ती फार काळ शांत राहणार नाही, असेही बोलले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.