रतन खत्री असे बनले मटका किंग...असा चालतो खेळ

Ratak Khatri was muttering this way
Ratak Khatri was muttering this way
Updated on

नगर ः लॉटरी, मटका ही कामगार वर्गाच्या आवडीचे खेळ आहेत. काहीजण तर सातत्याने आकडेमोड करीत असतात. एक रूपयापासून पुढे कितीही रक्कम मटक्यावर लावता येते. त्यामुळे मटका खेळणारांची संख्या जास्त आहे. मटका खेळून कोणी श्रीमंत झाला की नाही हे सांगता यायचे नाही. मात्र, जो मटका चालवायचा तो मात्र मालामाल झाला. एवढेच कशाला जे बुकिंग घेतात तेही कोट्यधीश झाले. कल्याण आणि मुंबई या नावाने हे मटका खेळला जातो.

रतन खत्री हे मटकाकिंग म्हणून अोळखले जायचे. त्यांचे आज मुंबईत ८८व्या वर्षी निधन झाले.  त्यांच्याच अधिपत्त्याखाली मटक्याचा धंदा चालायचा. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचे जाळे नाही, असे जाळे या मटक्याचे देशभर आहे. कोणत्याही भागातील खबर त्यांच्यापर्यंत काही क्षणात पोहोचते. एवढे ते अलर्ट आहेत. नेटवर्किंगवरच त्यांच्या धंद्याची मदार आहे. पोलिसांनी अनेकदा हा धंदा करणाऱ्यांवर कारवाई केली. परंतु तो आटोक्यात आणता आला नाही. आता खत्री यांच्या निधनानंतर मटका सुरू राहील का बंद होईल, याची चिंता मटक्याचे व्यसन असलेल्यांना लागली आहे. खत्री यांच्या निधनानंतरही मटका व्यवस्थित चालेल असे त्यातील जाणकार सांगतात.

कसा चालतो व्यवसाय 

मटक्याचा धंदा हा अवैध आहे. हा दोन नंबरचा धंदा असला तरी तो एक नंबरप्रमाणे चालविला जातो. कोणत्या तरी कोपऱ्यात एक बुकी असतो. त्याच्याकडे जाऊन पैसे लावायचे, तो खेळणार्याला चिठ्ठी देतो. ती चिठ्ठी सकाळी किंवा संध्याकाळी दाखवायची. जर तो आकडा लागला असेल तर तेवढी रक्कम द्यायची. ती चिठ्ठी म्हणजेच बेरर चेक असतो. शक्यतो या धंद्यात बेमाईमानी होत नाही. बुकिंग घेणाऱ्यांकडून आकडे आणि पैसे गोळा करणारे एजंट असतात. ते जिल्ह्याच्या किंवा शहराच्या मुख्य बुकीकडे तो सर्व खेळ जमा करतो. जे सीट असते त्याला खेळ म्हणतात. संबंधित एजंट मुंबईला कलेक्शन आणि आकड्याची यादी पाठवतो. त्यानंतर नंबर काढला जातो. कल्याण, मुंबई हे जुने आहेत. त्यात आता डे मधूर, मिलन, वरळी, राजधानी, तारा मुंबई, बालाजी किंग डे या नावाने मटका घेतला जातो.

खेळातील बारकावे आणि पद्धत
बावन्न पत्त्यांतील बारा रंगीत पत्ते (राजा, राणी, गुलाम) बाजूला काढले जातात. त्याला ‘भावली बाजूला काढणे’ असे म्हणतात. मटकेबाजारातील पत्ते पुढील विशेष नावाने ओळखले जातात. एक्का – एक्का, दुरी – दुवा, तिरी-तिया, चौका – चॉकलेट, पंजा – काँग्रेस, छक्का – छगन, सत्ता – लंगडा, अठ्याेष – अठ्या त, नव्वा – नयला, दश्शा – मेंढी/जिलबी.

तीन पत्ते उघडले जातात. ते कसेही आले तरी ते 1, 2, 3 अशा चढत्या क्रमाने लावून घेतले जातात. उदाहरणार्थ 9, 3, 6 असे पत्ते आले तरी ते 3, 6, 9 असेच लावून घेतले जातात. तो खेळ दोनदा खेळला जातो. त्याला ‘‘ओपन’ व ‘क्लोज’ ची खबर आली’ असे म्हणतात. ‘ओपन’ची खबर संध्याकाळी 4:12 ला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटांत म्हणजे 4:15 पर्यंत जगात पोचते, तर क्लोजची खबर संध्याकाळी 6.12 ला फुटते आणि अवघ्या तीन मिनिटांत म्हणजे 6.15 पर्यंत जगात पसरते.

उदाहरणार्थ 3, 6, 8 यांची बेरीज करायची (3+6+8 = 17) त्या बेरजेचा शेवटचा आकडा 7 म्हणजे ‘ओपन’/‘क्लोज’चा सत्ता/लंगडा आला; तर 1, 2, 3 = 6 ‘ओपन’/ ‘क्लोज’चा छक्का आला. ज्याला ‘ओपन’ लागला त्याला एक रुपयाला नऊ रुपये असे नऊपट रुपये मिळतात. 3, 6, 8 असे सगळे आकडे लावायचे असतील, तर त्याला ‘पाना लावा’ असे सांगतात. ‘ओपन’ व ‘क्लोज’चा पाना लागला तर त्याला ‘जॅकपॉट’ लागला असे म्हणतात.

मटक्याचे यू ट्यूब चॅनल आणि पुस्तके

मटका खेळणारे केवळ अडाणी किंवा कमी शिकलेले मध्यमवर्गीय आहेत, असे नव्हे. श्रीमंत, नोकरदार, अधिकाऱ्यांनाही मटक्याचे व्यसन आहे. मटक्याचे बुकिंग पूर्वी चिठठ्यांवर घेतले जायचे. आता त्यातही आधुनिकीकरण आले आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉपवर त्याचे बुकिंग घेतले जाते. संगम, जोडी, सुट्टा, सिंगल पाना, जॅकपॉट असे त्याचे प्रकार आहेत. आकडेमोड करीत अंदाज घेतला जातो. त्याची पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत. आता तर यू ट्यूब चॅनलही आले आहेत. तेथे तज्ज्ञ कोणता आकडा येणार याचे भाकित करतात. सिंगल लागला तर एक रूपयाला ९ रूपये, जोडसाठी एक रूपयाला ९०, सिंगल पानाला १ रूपयाला १२०, ट्रीपल पानासाठी एक रूपयाला ५०० रूपये, गुणिले पानाला ८०० रूपये तर जॅकपॉटसाठी एक रूपयाला १० हजार रूपये दिले जातात. त्यामुळे या खेळाचे अनेकांना आकर्षण आहे. हे भाव प्रत्येक ठिकाणी वेगळे असू शकतात.

खत्री आणि दंतकथा

रतन खत्री य़ांच्याविषयी अनेक दंतकथा आहेत. प्रत्येक शहरात वेगळी कथा सापडेल. एक प्रसिद्ध कथा अशी आहे की, खत्री एका शहरात गेले आणि टांग्यात बसले. तो टांगेवाला मटका खेळायचा. परंतु त्याला खूप दिवसांपासून त्याला आकडा लागला नव्हता. त्यामुळे तो शिव्या घालत होता. मात्र, ज्याला शिव्या देत होता, तो माणूस आपल्या टांग्यात बसला आहे. हे त्याला माहिती नव्हतं. खत्री यांनीही आपली अोळख सांगितली नाही. परंतु त्या टांगेवाल्याला खत्रींनी जॅकपॉट लावलाय सांगितले. दुसऱ्या दिवशी खत्री यांनी तोच आकडे काढला. आणि त्या टांगेवाल्याला जॅकपॉट लागला. त्यातून तो मालामाल झाला.

खत्री कसे बनले मटका किंग

रतन खत्री यांच्यापूर्वी हा धंदा कल्याण भगत नावाचे गृहस्थ चालवित होते. त्यांनी या धंद्यातून भरपूर माया कमवली. जसजसा हा धंदा वाढत गेला तसतशी त्यांना मनुष्यबळाची गरज पडू लागली. १९६० एकेदिवशी त्यांच्या दारात रतन खत्री नावाचा इसम आला. पुढे ते या धंद्याचे मॅनेजर झाले. काहीजण सांगतात, खत्री हे सुरूवातीपासूनच त्यांचे पार्टनर होते. १९६४मध्ये भगत यांच्यापासून खत्री वेगळे झाले. आणि आपला वेगळा व्यवसाय सुरू केला. बघता बघता ते या धंद्यातील किंग बनले. कालौघात त्यांनी या धंद्यात सुधारणा केली. सर्व चिठ्ठ्या मटक्यात टाकल्या जायच्या आणि नंतर आकडा काढला जायचा, म्हणून मटका असे या खेळाला नाव पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.