अहमदनगर - नगर शहरातील अंकुश चत्तर खूनप्रकरणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. अहमदनगरला खासदार सत्ताधारी पक्षाचे आहेत. आता शहरातील आमदारही सत्ताधारी पक्षाच्या बाजूला गेले आहेत. दुसरीकडे, गुन्हेगारी आणि गुंडगिरी वाढतच आहे.
त्यामुळे सत्ताधारी मंडळींचे याला अभय आहे काय, असा प्रश्न जनतेला पडतो. सरकारचे अस्तित्व नगरमधील गुंडांना दिसू द्या. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारी संपविण्यासाठी जात-धर्म यांचा विचार न करता कारवाई व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज विधानसभेत केली. थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. यासंबंधी कारवाई करून सभागृहात अहवाल सादर केला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
नगर शहरात खुनाच्या दोन घटना लागोपाठ घडल्या. काही महिन्यांपूर्वी ओंकार भागानगरे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच शनिवारी (ता. १५) रात्री पाइपलाइन रोडवरील एकवीरा चौकात राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांची आठ- दहा जणांनी मिळून हत्या केली.
आरोपींमध्ये भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे याचा समावेश आहे. या हत्याकांडामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. खुनाच्या दोन्ही घटनांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी वारंवार अशा घटना घडत आहेत. याबाबत थोरात यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले.
कडक शिक्षा झाली पाहिजे
थोरात म्हणाले, की हत्या झालेले चत्तर हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी होते. आठ- दहा लोकांनी त्यांची हत्या केली. गुन्हेगार कोण होते हे सर्वांनी पाहिले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थित आहेत. गुन्हेगाराला जात- धर्म नसतो, गुन्हेगाराला पक्षदेखील नसतो. जो कोणी गुन्हेगार असेल, त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. नगरमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारीचा बंदोबस्त केला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री येथे उपस्थित आहेत. सरकार म्हणून एक अस्तित्व असते. ते दाखवण्याची जबाबदारी आली आहे. लोक भयभीत आहेत. अत्यंत अस्थिर, अशांत वातावरण आहे. या मुद्द्यावर गृह विभागाची चर्चा घडवून आणण्याची अपेक्षा मी करतो.
निलंबनाचा निर्णय प्रदेश पातळीवर
आरोपी स्वप्नील शिंदे हा भाजपचा नगरसेवक आहे. चत्तर यांच्या खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याला पक्षातून निलंबित करण्याची मागणी पुढे आलेली आहे. त्यानुसार भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी शिंदे याच्या निलंबनाचा प्रस्ताव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे शिंदे याच्या निलंबनाचा निर्णय प्रदेश पातळीवरच होणार आहे.
विभ्या व फुलारीचा शोध सुरू
चत्तर यांच्या खून प्रकरणातील नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली आहे. गुन्ह्यातील विभ्या कांबळे व राजू फुलारी या दोन आरोपींचा मात्र अद्याप शोध लागलेला नाही.
गृहमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन
थोरात यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की गुन्हेगाराचा जात, धर्म, पक्ष न पाहता त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सभागृहात याबाबत निवेदन ठेवण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.