अहमदनगर : घरात पाहुणा येणार असल्याने नवचैतन्य निर्माण झाले होते. प्रत्येक दिवस आनंदात जात होता. या आनंदात आठ महिने लोटल्यानंतर घरात धार्मिक विधीचा निर्णय झाला अन् दुःखाचा डोंगर कोसळला. बाळाला जीवदान देऊन ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बाळाला जन्म देऊन मातेने घेतला जगाचा निरोप
विधीतील कार्यक्रमावरून पती-पत्नींमधील किरकोळ वाद विकोपाला गेला. दारूच्या नशेत पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यात गंभीर जखमी होऊन ती कोमात गेली. रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा नसल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले. ती आई झाली, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. वनकुटे (ता. पारनेर) येथील सुनील नबाब जाधव (वय ३०) याचा वर्षा हिच्याशी सुमारे दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. सुनील व वर्षा हे दोघे सध्या विळद पिंप्री (ता. नगर) येथे राहत होते. सुनील दारूच्या आहारी गेला होता. त्यातून घरात सतत वाद होत होते. वर्षाला काही धार्मिक विधी करायचे होते. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. सुनील व वर्षा या दोघांमध्ये मंगळवारी (ता. २७) सकाळीच वाद झाला. त्यानंतर सुनील दारू पिऊन घरी आला. रागाच्या भरात त्याने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात वर्षाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ती बेशुद्ध पडली. त्यानंतर त्याची नशा उतरली. टोल-फ्री क्रमांक असलेल्या १०८ वर फोन करून त्याने रुग्णवाहिका बोलावून घेतली. वर्षाला उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र...
रस्ता अपघातात डोक्याला मार लागल्याची बतावणी तेथे केली. डॉक्टरांनी पाच-सहा तास उपचार केले. ती शुद्धीवर येत नसल्याने अखेर पुण्याला ससून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीही उपचाराची शर्थ केली. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने कोमातून ती बाहेर येण्याची शक्यता मावळत चालली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करून बाळाचा जीव डॉक्टरांनी वाचविला. यामुळे वर्षाचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण झाले, मात्र मुलाचा चेहरा न पाहताच जगाचा निरोप घेतला. ससून रुग्णालयाने अकस्मात मृत्यूची नोंद करून अहवाल एमआयडीसी पोलिसांकडे पाठविला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संदीप विष्णू गायकवाड यांच्याकडे तपास होता. मृत वर्षाचा पती सुनील याच्याकडे विचारणा केली. आपण पत्नीसह तिघे दुचाकीवरून येत असताना रस्त्याच्या कडेला गवत खात असलेला घोडा अचानक मध्ये आल्याने दुचाकीवरून खाली पडल्याने वर्षाच्या डोक्याला दुखापत झाली, अशी बचावाची भूमिका सुनीलने घेतली. गायकवाड यांनी अपघातामुळे सुनीलला किती जखमा झाल्या, याची पाहणी केली. त्याला किरकोळ स्वरूपाची जखम होती. त्यामुळे संशय आला. गरोदर महिला दुचाकीवर असताना तिसरी व्यक्ती दुचाकीवर कशी बसली, अशी शंका आली. तिसरी व्यक्ती कोण होती, असे विचारल्यावर, अनोळखी व्यक्तीने आपल्याला लिफ्ट मागितल्याने त्याचे नाव माहीत नसल्याचे सांगितले. सुनीलचे हे म्हणणे विश्वासार्ह नसल्याने, हे प्रकरण वेगळे असल्याची गायकवाड यांची खात्री झाली. त्यांनी सुनील राहत असलेल्या विळद पिंप्री आणि त्याचे मूळ गाव असलेल्या वनकुटे येथे जाऊन माहिती घेतली. शेजारील लोकांना विश्वासात घेतले. त्यांनी, सुनील दारूच्या आहारी गेलेला असून, पत्नीला सतत मारहाण करीत असल्याचे सांगितले.
घटना एकीकडची, दाखवली दुसरीकडे
सुनील दुचाकीवरून २० जुलै रोजी वनकुटे गावाकडून येत होता. त्यावेळी रस्त्याच्या मध्ये घोडा आल्याने तो पडला होता. त्यामध्ये तो किरकोळ जखमी झाला होता. त्यावेळी त्याने वनकुटे गावात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घेतले होते. या खऱ्या अपघातावरून त्याने पत्नीचा खून करून खोट्या अपघाताचा बनाव रचला. तपासी अधिकाऱ्यांनी वनकुटे येथे जाऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी २० जुलैला उपचार केल्याचे सांगितले, तर सुनीलने या जखमा २५ जुलैला खोट्या अपघातातील असल्याचे भासविले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.