अहमदनगर : रात्रं-दिवस लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आपण वर्षोनुवर्षे चांगली घरंही देऊ शकलो नाही. देश, राज्याच्या संरक्षणासाठी कितीतरी अधिकारी आणि पोलिसांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान कदापि विसरता येणार नाही. हे सगळं ठीक आहे. पण, पोलिसांच्या घराचा प्रश्न सुटणार तरी कधी !
चाळीत राहणारे भोसले पोलिसकाका आजही आठवतात. पिळदार मिशा, पिळदार शरीर, त्यावेळची खाकी हाफ पॅन्ट, चकाकणारे काळे बूट, पोटऱ्यांना बांधलेल्या त्या पट्ट्या, काळा बेल्ट, डोक्याला टोपी. भोसले काकांचा आवाजही भारदस्त होता. त्यांचं नाव ऐकलं की भल्याभल्यांना घाम फुटायचा. हे काका निवृत्त होईपर्यंत कधीही पोलिस वसाहतीत राहायला गेले नाहीत. त्यांना चार मुली आणि एक मुलगा होता. नोकरीवर त्यांचा चरितार्थ चालत असे. ते एक सुखी कुटुंब होते. इमानेइतबारे त्यांनी नोकरी केली, कधी अंगाला डाग लावून घेतला नाही. चाळीत मुलांसाठी एकगोष्ट करण्यास ते कधीही विसरले नाहीत. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ते पोलीस ग्राऊंडवर घेऊन जात. परेड दाखवित.वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी युवासेनेने घ्यावी
चॉकलेट देत. ते ग्राऊंड आजही आठवते. तीन बाजूनेे पोलिसांची वसाहत होती. समोर पोलिस निरीक्षकांचंही मोठ घर असायचं. त्यावेळची पोलिस वसाहत अशी होती. ती आजही तशीच आहे. त्यामध्ये काहीही फरक पडला नाही. मोडकीतोडकी, गळणारं छत, फुटकी कौलं, एक-दोन नळ. ग्राऊंड बरं वाटायचं. पण, पोलिस वसाहतीतील घरात पाय ठेवू वाटायचा नाही. पोलिसांची घरं नीटनेटकी का नाहीत हो ! का प्रत्येक सरकार याबाबतीच उदासीन आहे.
‘सद्ररक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्र पोलिस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. राज्यात पोलिसांची संख्या अंदाजे दोन लाखांच्या घरात असावी. नियमित पोलिस भरती प्रक्रिया सुरू असते. प्रत्येक जिल्ह्याला पोलिस अधीक्षक असतो. तसं अहमदनगर जिल्ह्यालाही आहे. आपण जर प्रत्येक जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांचे अलिशान घर पाहिले तर डोळे दिपून जातात.
कमी-अधिक प्रमाणात पोलिस अधिकाऱ्यांची घरं ही आकर्षक सुंदर, टुमदार असतात. सर्व सोयी-सुविधांनी ती नटलेली असतात. दिमतीला पोलिस कर्मचारी असतात. पाण्याचा ग्लासही त्यांना हातात मिळतो. आणखी काय हवे त्यांना, असा विचार कोणीही सामान्य नागरीक करेल. एकीकडे असे चित्र असताना मात्र रात्रं-दिवस लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांना आपण वर्षोनुवर्षे चांगली घरंही देऊ शकलो नाही. देशाच्या संरक्षणासाठी आजपर्यंत कितीतरी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यांचे बलिदान कदापि विसरता येणार नाही. हे सगळं ठीक आहे. पण, बिचाऱ्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न वर्षोनुवर्षे सुटला नाही. त्यांना स्वत:च्या कथा आणि व्यथाही मांडण्याचा अधिकार नाही. त्यांनी आक्रोश तरी कोणाच्या विरोधात करायचा हाही प्रश्न आहेच.
अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांच्या घराचा प्रश्नही असाच गंभीर असून तो ‘सकाळ’ च्या चमूने समोर आणला आहे. या घरांकडे पाहिलं तर पोलिस तेथे राहतात तरी कसे असा प्रश्न कोणालाही पडेल.शहरातील सर्जेपुरा परिसरातील पोलिस वसाहत आहे. तेथे पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अहोरात्र कामाच्या गराड्यात गुंतलेल्या पोलिसांना राहत्या घरी या अडचणरूपी शिक्षा भोगावी लागते. तुरूंगापेक्षा वेगळी स्थिती या वसाहतीमध्ये नाही, हे चित्र आमच्या चमूने पुढे आणले आहे.
गळके छत, तुटलेली दारे
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या इमारतीची देखभाल दुरुस्ती आहे. या विभागाचे या वसाहतीकडे दुर्लक्ष आहे. घरांची कौले उचकटलेली आहेत, तर काही घरांच्या पत्र्यांना भोके पडली आहेत. गळके छत, ओलावा लागलेल्या भिंती, तुटलेली दारे-खिडक्या, पाण्याचा तुटवडा, स्वच्छतागृहांची दैना, तुंबलेली गटारे, ओव्हरफ्लो झालेल्या कचराकुंड्या अशी दयनीय अवस्था जिल्ह्यातील सर्वच पोलिस वसाहतीची कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. काही पोलिस वसाहती चांगल्याही असतील नाही असे नाही. प्रमाण कमी आहे.
आज तीस-चाळीस वर्षांनंतर भोसले पोलिसकाका वसाहतीत का राहायला गेले नाहीत हे समजले. ते निवृत्तही चाळीतील खोलीतच झाले. शेवटी येथे मुद्दा असा आहे, की पोलिस वसाहतींविषयी प्रत्येक सरकार घोषणा करते. आमचे सरकार पोलिसांना घरे देणार म्हणून ! परंतु, त्यांना सर्व सोयी-सुविधांनी उपयुक्त असलेली घरे मिळणार कधी हाच खरा प्रश्न आहे !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.