नगर : राज्य परिवहन महामंडळाची नगर-पुणे पहिली बस एक जून 1948 रोजी धावली होती. या घटनेला 72 वर्षे पूर्ण झाली असून, त्याची पुनरावृत्ती 73व्या वर्षात होणार आहे. या वेळी बसऐवजी एसटीचा मालवाहतूक ट्रक नगर-पुणेदरम्यान धावणार आहे. विशेष म्हणजे, दापोली येथे तयार झालेला हा पहिलाच ट्रक आहे.
कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा फटका बसला आहे. त्यातून एसटीला बाहेर काढण्यासाठी सरकारसह एसटीकडून प्रयत्न सुरू आहेत. सलग दोन महिने एसटी बंद राहिल्याने तिच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. आता एसटी बस सुरू झाली असली, तरी 50 टक्के प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. त्यामुळे एसटीच्या तोट्यात आणखी भर पडत आहे. एसटीला नफ्यात आणण्यासाठी सरकारतर्फे मालवाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार एसटीकडून मालवाहतुकीसाठी प्रत्येक आगारात नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
या कामासाठी प्रत्येक विभागीय कार्यशाळेकडे असलेले जुने ट्रक वापरण्यात येत असून, दापोडी (पुणे) येथे नवीन ट्रकबांधणीचे काम सुरू आहे. त्यातील पहिला ट्रक तयार झाला असून, तो नगर विभागाला मिळाला आहे. एसटीचा वर्धापनदिन उद्या (सोमवारी) साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच नगर विभागाला नवीन ट्रक मिळाला असून, तो नगर-पुणे रस्त्यावर माल घेऊन धावणार आहे.
अवश्य वाचा ः सुखद वार्ता ः राज्यात एसटी करणार मालवाहतूक
एक जून 1948 रोजी पहिली एसटी नगर-पुणेदरम्यान धावली आहे. त्याची पुनरावृत्ती एक जून 2020 रोजी होत आहे. एसटीऐवजी आता माल घेऊन एसटीचा ट्रक नगर-पुणेदरम्यान धावणार आहे. त्या दृष्टीने एसटीकडून हा ट्रक सजवून तो मार्गस्थ करण्यात येईल. नगरमधून पहिली बस, त्यानंतर महिलांसाठी स्वतंत्र पहिली बस सोडण्याचा मान मिळाल्यानंतर, हा तिसरा मान जिल्ह्याला मिळाला आहे.
एसटीच्या ट्रकचे वैशिष्ट्य
एसटीकडून मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. या वाहतुकीकडे सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा ट्रक पत्र्याच्या बांधणीतील असल्याने त्यातून माल सुरक्षित पोच होणार आहे.
आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण : गिते
72 वर्षांपूर्वी नगर-पुणेदरम्यान पहिली बस धावल्यानंतर आता 73व्या वर्षी एसटीचाच मालवाहतूक ट्रक सोमवारी (एक जून) नगर-पुणेदरम्यान धावणार आहे. हा आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण आहे.
- विजय गिते, विभागनियंत्रक, नगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.