शिवराळ भाषा, कमरेखाली वार करणारी विधानं आणि पराकोटीच्या द्वेषाचे राजकारण, हे आजकाल भूषण मानले जात आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे. खरं तर कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले आहे. ते आमदार, खासदार आणि मंत्रीही राहिले आहेत. त्यांनीच जर, ‘पंतप्रधानांना मी शिव्या देऊ शकतो आणि मारूही शकतो’ असे विधान करणे नक्कीच शोभनीय नाही. त्यांनी याबाबत कितीही खुलासा करण्याचा प्रयत्न केला किंवा ‘तसे मला म्हणायचेच नव्हते,’ असे कितीही ओरडून सांगितले, तरी ते कोणालाही पटणारे नाही. पटोलेंचे कधीही समर्थन करता येणार नाही.
वाचाळवीरांची कमी नाही.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर आहे. आघाडीचा हा प्रयोग फार काळ टिकणार नाही, असे विरोधक म्हणत असले, तरी सरकार टिकून आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तर जाहीरपणेच सांगितले होते, की हे सरकार सध्या तरी पडणार नाही. हे सगळं खरं असलं, तरी पटोले यांच्यासारखे नेते आपल्या वादग्रस्त विधानाने सरकारला अडचणीत आणत आहेत. त्यांचे हे काही पहिले वादग्रस्त विधान नाही. यापूर्वी त्यांनी विरोधकांना सोडा, सत्तेतील आघाडीच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्याचे काम केले आहे. आपण काही बोललं तर लोक आपल्या पाठीशी उभे राहतात, असे मुळात समजण्याचे काही कारण नाही. सत्ता येते-जाते; पण राजकारणातील सुसंस्कृतपणा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे.
आपल्याकडे वाचाळवीरांची काही कमी नाही. असे विधान करायचे, की चर्चा स्वत:भोवती फिरली पाहिजे. पटोलेंवर राहुल गांधींचा विश्वास आहे. त्यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा आहे. ते काहीही बोलू लागले तरी जनता ते सहन करेलच असे नाही. कॉँग्रेस देशातील सर्वांत जुना, जाणता पक्ष आहे. या पक्षाला इतिहास आहे. देशासाठी त्याग केलेले शेकडो नेते या पक्षात होऊन गेले. वसंतदादा पाटील, शंकराव चव्हाण, विलासराव देशमुख, ते पृथ्वीराज चव्हाण, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण अशा कितीतरी नेत्यांची नावे घेता येतील.
सर्वांचीच घरं काचेची
हे झाले नानांचे. म्हणून भाजप, शिवसेना किंवा इतर पक्षांतील नेते धुतल्या तांदळासारखे आहेत असे मुळीच नाही. भाजपमध्ये तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाचाळवीर ढिगाने सापडतील. सोनिया गांधी असोत की राहुल गांधी, प्रियंका गांधी; त्यांच्याविषयी कोण काय बोलते, कशी निंदानालस्ती केली जाते, हे काही लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्याने जे काही तारे तोडले आणि नंतर माफी मागितली, ती ताजीच घटना आहे.
शिवसेनेचा तर इतिहासच आहे अशी निंदानालस्ती करण्याचा. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक असोत, की कॉँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते. शिवसेनेने नेहमी आपल्या विरोधकांचा समाचार घेताना जी काही उधळण करायची आहे ती केली आहे. असो.
रस्त्यावरची भाषा नको
येथे सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की राज्यात विरोधी पक्ष भक्कम आहे. या पक्षाचे नेते देवेंद्र फडणीस हे फायरब्रँड नेते आहेत. शंभराहून अधिक आमदार आहेत. सत्तेवर असणाऱ्या मंडळींनी कोणतेही विधान करताना त्याचे काय परिणाम होतील, याचा तरी विचार करायचा. याचा अर्थ भाजपवर टीका करायची नाही का? तर असे मुळीच नाही. मात्र पंतप्रधानांविषयी थेट असे विधान करणे योग्य नाही. पंतप्रधान हे लोकनियुक्त आहेत. जनेतेने त्यांना निवडून दिले आहे. जर कॉँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास आहे, तर असली रस्त्यावरची भाषा वापरायची का, याचा विचार मुळात कॉँग्रेसच्या मंडळींनी करावा.
नाना पटोले यांच्याअगोदर मंत्री बाळासाहेब थोरातही प्रदेशाध्यक्ष होते. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आहे. मात्र, त्यांनी राजकारण करताना कधीही मर्यादेचे उल्लंघन केले नाही. पक्ष अडचणीत येणार नाही, विरोधकांना फायदा होईल असे विधान किंवा कोणताही निर्णय घेतला नाही, याबाबत त्यांचे कौतुकच केले पाहिजे. नाना, त्यांचा आदर्श घ्या...
- प्रकाश पाटील
संपर्क - ९८८१९०७२११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.