आमदार दराडे यांच्या विरोधात कचरे-कोल्हे रिंगणात; नाशिक विरुध्द नगर लढत; २६ जूनला होणार निवडणूक

गेल्या दोन निवडणुकांपासून या मतदारसंघावरील टिडीएफचे पूर्वीपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले. २०१२ साली अपूर्व हिरे येथून टिडीएफचे लेबल लावून निवडून आले. मात्र, ते शिक्षक नव्हे, तर संस्थाचालक होते.
Nashik vs Nagar kachare and kolhe against mla darade election will held on June 26
Nashik vs Nagar kachare and kolhe against mla darade election will held on June 26Sakal
Updated on

शिर्डी : निवडणूक आयोगाने पुढे ढकलेली नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता येत्या २६ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सुमारे पंधरा हजार माध्यमिक शिक्षक आणि संस्थाचालक असलेल्या उमेदवारांचे राजकीय विश्व ढवळून निघणार आहे.

या मतदारसंघातील येवल्याचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या विरोधात टिडीएफचे उमेदवार प्रा. भाऊसाहेब कचरे आणि संजीवनी विद्यापीठाचे विश्वस्त युवानेते विवेक कोल्हे हे नगर जिल्ह्यातील दोन उमेदवार प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात असतील. प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे यांनी निवडणूक लढविण्याचा मनोदय जाहीर केला. मात्र, अद्याप तरी तयारी सुरू केलेली नाही.

गेल्या दोन निवडणुकांपासून या मतदारसंघावरील टिडीएफचे पूर्वीपासूनचे वर्चस्व संपुष्टात आले. २०१२ साली अपूर्व हिरे येथून टिडीएफचे लेबल लावून निवडून आले. मात्र, ते शिक्षक नव्हे, तर संस्थाचालक होते. मागील निवडणुकीत आमदार किशोर दराडे यांनी थेट शिक्षकांसोबत संपर्क साधला आणि त्यांना आपल्या बाजूने वळवून अवघ्या पंधरा दिवसांत ही निवडणूक जिंकली. त्यावेळी पैठणी पॅटर्न हा विषय माध्यमात गाजला.

हे लक्षात घेऊन टिडीएफने यंदा शिक्षकच होईल शिक्षकांचा आमदार ही टॅगलाईन घेऊन प्रा. कचरे यांना मैदानात उतरविले. संस्थाचालकांचे उमेदवार अनेक आणि आमचा एक अशी रणनीती देखील आखली. टिडीएफमध्ये शिक्षकांच्या विविध पुरोगामी संघटनांचे एकत्रिकरण आहे. कागदावर या परिषदेचे संख्याबळ चाळीस ते पन्नास हजारांहून अधिक असू शकते.

मात्र, जेवढी निवडणूक छोटी आणि मतदारसंख्या कमी. तेवढी ती तत्त्व आणि विचारसरणीवर लढविणे अवघड असते. हे यापूर्वीच्या दोन निवडणुकात संस्थाचालक उमेदवारांनी केलेल्या किमयेमुळे सिध्द झाले. असे असले, तरी मागील निवडणुकीत दराडे यांना पहिल्या पसंतीच्या मतांवर विजय मिळविता आला नाही. टिडीएफने आपला प्रभाव दाखवून दिला ही प्रा. कचरे यांच्या जमेची बाजू.

युवानेते विवेक कोल्हे यांनी अतिशय नियोजनबध्द पध्दतीने प्रचार मोहिमेची आखणी केली आहे. शुगर लाॅबीचे प्रतिनिधी आणि सिव्हिल इंजिनिअर असलेले कोल्हे हे वयाच्या तेहेतिसाव्या वर्षी या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत.

त्यामुळे कमीत कमी जोखीम पत्करून ही निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली नसली तरच नवल. त्यांनी आपली मोठी यंत्रणा या निवडणुकीत उतरविली आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. अडचणीतला गणेश कारखाना यशस्वीपणे चालवून दाखविला.

संजीवनी विद्यापीठाचे ते विश्वस्त आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्याकडे स्वतःची मतपेढी देखील आहे. माणसे जोडण्याची हातोटी या निवडणुकीत त्यांची जमेची बाजू ठरू शकेल. नाशिकची मराठा विद्या प्रसारक संस्था, के. के. वाघ शिक्षण संस्था यासह उत्तर महाराष्ट्रातील विविध संस्था चालकांसोबत त्यांचा संपर्क आहे.

डाॅ. विखे पाटील हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे धाकटे बंधू आहे. त्यांच्याकडेही मोठी यंत्रणा आणि हक्काची मतपेढी आहे. मात्र, अद्याप तरी त्यांनी निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केलेली नाही. विद्यमान आमदार दराडे यांच्याकडे थेट शिक्षकांसोबत संपर्क साधून निवडणूक जिंकण्याचा आणि सर्वांनाच चकीत करण्याचा अनुभव आहे. नाशिकचे ॲड. संदीप गुळवे हे देखील इच्छुक आहेत.

अंदाजे मतदारसंख्या

नाशिक ..............२३ हजार

नगर ................. १५ हजार

धुळे................... ९ हजार

जळगाव ............ १३ हजार

नंदूरबार ..........४ हजार ५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.