शिर्डी (जि.अहमदनगर) : साईसंस्थानमध्ये (sai sansthan) काल (मंगळवारी) रात्री पोलिसांनी अटकसत्राची मोहीम राबविली. संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह सहा जणांना अटक केली. आता त्यापाठोपाठ, शंभर वर्षाहून अधिक जुने बांधकाम असलेल्या साईमंदिराच्या (sai temple) वास्तूत पुरातत्त्व विभागाचा सल्ला न घेता काही बदल करण्यात आले का, जागतिक कीर्तीच्या या पुरातन मंदिरातील या संभाव्य बदलांची सुरक्षेच्या कारणास्तव दहशतवादविरोधी पथकाला कल्पना देण्यात आली होती का, या दोन मुद्यांवरून आता नवा वाद उपस्थित होण्याची शक्यता आहे. या वादाच्या केंद्रस्थानी बदलून गेलेले कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हेच असणार आहेत.
साईसंस्थानमधील अटकसत्रानंतर नवा वाद शक्य
याबाबत माहिती देताना माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे ‘सकाळ’शी बोलताना म्हणाले, की बगाटे यांनी या बदलास तदर्थ समितीची मान्यता घेतली नव्हती. परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या बदलांची माहिती घेण्यासाठी तदर्थ समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश आणखी एका सदस्यासह साईमंदिरात गेले. त्यावेळी बगाटे यांच्या सांगण्यावरूनच या भेटीचे सीसीटीव्ही फुटेज व काही फोटो समाजमाध्यमात व्हायरल करण्यात आले. त्यावरून काल रात्री हे अटकसत्राचे रामायण घडले. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार बगाटे असल्याने, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आपण लावून धरणार आहोत.
साईमंदिर अतिरेक्यांच्या निशाण्यावर?
पुरातन साईमंदिरात बगाटे यांनी केलेल्या बदलातून नवा वाद उभा राहील. या बांधकामास शंभर वर्षांहून अधिक काळ झाला. त्यात काही बदल करायचा तर पुरातत्त्व विभाग व तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जगभरातील भाविकांचे श्रद्धा केंद्र असलेले साईमंदिर अतिरेक्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्यास विशेष सुरक्षा पुरविण्यात आली आहे. हे लक्षात घेऊन, बदल करताना दहशतवादविरोधी पथकासोबत सल्लामसलत करणे गरजेचे होते. बगाटे यांनी तदर्थ समिती, पुरातत्त्व विभाग व दहशतवादीविरोधी पथक यांपैकी कोणाचीही परवानगी न घेता साईमंदिराच्या बांधकामात काही बदल केले, ही गंभीर बाब आहे. याबाबतही आपण आवाज उठविणार आहोत, असे काळे यांनी सांगितले.
सुमारे पन्नास कोटी रुपये खर्चाची बिले
साईसंस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी येथील कार्यकाळात पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची असलेली एकूण सुमारे पन्नास कोटी रुपये खर्चाची बिले तदर्थ समितीची परवानगी न घेता अदा केली आहेत. त्याची चौकशी व्हावी, तसेच साईमंदिर सुरक्षेचे ऑडिट केले जावे, अशा मागण्या आपण संबंधित विभागाकडे केल्या आहेत. - संजय काळे, माहिती अधिकारातील कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.