पारनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार वाढला आहे. लोकायुक्तासारखा कायदा होत नाही. शेतक-यांना हमी भाव मिळत नाही. गावे आदर्श करण्याऐवजी सरकार वाइन घरोघरी पोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता आणखी वाईट पाहण्याची इच्छा नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.
वाइनविक्रीच्या निर्णयाविरोधात हजारे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. त्या आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन सावंत व उपआयुक्त सुनील चव्हाण यांनी हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी उभयतांनी हजारे यांना, ‘उपोषण करू नये, तुमचे काय म्हणणे आहे ते सांगा. या कायद्यात काही दुरुस्त्या हव्या असतील तर त्याही सांगा. आम्ही तसा बदल करू शकतो. मात्र, आपण उपोषण करू नये,’ अशी विनंती केली.
त्या वेळी हजारे यांनी, सरकार नको त्या गोष्टींकडे लक्ष देत आहे. दारूविक्रीतून महसूल वाढावा म्हणून दारूच्या किमती कमी केल्यात. माझे जीवन मी देशसेवा व समाजसेवेसाठी अर्पण केलेय. जगायचे ते समाजासाठीच. त्यामुळे उपोषणावर मी ठाम आहे, असे सांगितले.
राज्यात अवघे सहाशे-सातशे परवाने
यावेळी सावंत म्हणाले, की हा निर्णय शेतकरीहिताचा आहे. वाइन द्राक्षे, स्ट्रॉबेरी व जांभूळ यांसारख्या शेतीमालापासून तयार केली जाते. त्यामुळे शेतक-यांच्या मालाला अधिक बाजारभाव मिळेल. शेतक-यांचा आर्थिक फायदा होईल. वाइनची विक्री सर्रास दुकानांतून केली जाणार नाही. राज्यात फक्त सहाशे ते सातशे दुकानांनाच परवाना दिला जाणार आहे. परवाने देताना शाळा, मंदिर यांपासून दूर असणा-या मोठ्या व नोंदणीकृत दुकानांना व दहापेक्षा अधिक नोकर कामाला असतील त्याच ठिकाणी देण्यात येणार आहे. यात अल्कोहोलचे प्रमाणही कमी आहे. तुम्ही या निर्णयात काही दुरुस्ती सुचवा, तशी दुरुस्तीही करू, अशी विनंती सावंत यांनी हजारे यांना केली.
ऊसउत्पादकांना किती फायदा झाला?
हजारे म्हणाले, की उसापासून दारू बनते. त्यात किती शेतक-यांचा फायदा होऊन ते सुधारले, असा प्रश्न उपस्थित केला. माझा तुमच्यावर रोष नाही. माझी मागणी मान्य केली तर ठीक, नाही तर या मागणीसाठी माझे आयुष्य संपले तरी हरकत नाही, असा निर्वाणीचा इशाराही हजारे यांनी दिला. या वेळी सरपंच लाभेश औटी, सुरेश पठारे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.