श्रीगोंदे : नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक केशव मगर आणि अण्णासाहेब शेलार यांना साखर सहसंचालकांनी नोटिसा बजावल्या आहेत. संचालक मंडळाच्या तीनपेक्षा जास्त बैठकांना ते गैरहजर राहिल्याने, ‘अपात्र का करू नये,’ अशा आशयाच्या या नोटिसा आहेत. सत्ताधाऱ्यांना कारखाना निवडणुकीत आमची भीती वाटत असल्याने त्यांनी ही बालिश पळवाट शोधल्याचा आरोप या दोघांनी करीत, आता निवडणूक आरपारची करणार असल्याचा इशारा दिला आहे.
नागवडे कारखान्याची निवडणूक कोविड संकटाने पुढे ढकलली असली, तरी तेथील राजकारण मात्र थांबत नाही. मगर यांनी उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्यावर गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले, तर पंचायत समिती सदस्य जिजाबापू शिंदे यांनी कारखाना कारभाराची चौकशी राज्य सरकारच्या माध्यमातून लावल्याने खळबळ उडाली.
अण्णासाहेब शेलार हे विखे पाटील कुटुंबाच्या जवळ असल्याने, त्यांचा विरोध जास्त चर्चेत आहे. त्यातच आता मगर व शेलार हे कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकांना गैरजहर राहिल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार सभासद नितीन वाबळे व साहेबराव महारनोर यांनी केली होती. त्यानुसार साखर सहसंचालकांनी या दोघांना नोटिसा बजावीत, येत्या सोमवारी म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. (Notice for disqualification of Annasaheb Shelar and Magar)
मगर म्हणाले, ‘‘बापूंनंतर राजेंद्र नागवडे यांनी कारखान्यात कसा व किती गैरव्यवहार केला, याचा सगळा हिशेब आमच्याकडे आहे. योग्य ठिकाणी त्याबाबत आम्ही पुरावे सादर केल्याने कारखान्याची चौकशीही लागली आहे. हा सगळा विषय निवडणुकीत पुढे येऊन, कारभाराचा बुरखा फाडला जाईल, ही भीती नागवडे यांना असल्याने त्यांनी जवळच्या लोकांना पुढे करून अशा पळवाटा शोधल्या आहेत.
आपल्याला कोरोना झाला होता व ज्या ठिकाणी संचालकांची बैठक होती, तेथे गर्दी होत असल्याने आपण काही बैठकांना जाऊ शकलो नाही. त्यातच संचालक मंडळाची मुदत संपल्याने कुठलेही धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याने, या बैठकांचे महत्त्वही नसते.’’ कोरोनाचे कारण दाखवून ऑनलाइन निविदा देत त्यात गैरव्यवहार करणाऱ्या कारखाना व्यवस्थापनाने संचालकांच्या बैठका ऑनलाइन का घेतल्या नाहीत, असा सवालही मगर यांनी केला.
शेलार म्हणाले, ‘‘नागवडे हे कारखान्याचा कारभार खासगीसारखा चालवीत असल्याने, ते वेगळ्याच धुंदीत आहेत.
आता हे गैरव्यवहाराचे सगळे पितळ उघड होऊ लागल्याने निवडणुकीत उत्तर द्यावे लागणार असल्याने, आमची भीती वाटू लागली आहे. सहकारात संचालकांच्या मताला महत्त्व असते. येथे मात्र संचालकांना बोलण्याचासुद्धा अधिकार नसल्याने, या बैठका कागदावर असतात.’’ (Notice for disqualification of Annasaheb Shelar and Magar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.