शिर्डी (अहमदनगर) : अवघ्या चाळीस वर्षाच्या वाटचालीत भाजप देशभर वेगाने फैलावला. जगातील सर्वाधिक सदस्य संख्या असलेला सत्ताधारी पक्ष असे बिरूद मिरवू लागला. काँग्रेस पक्षाच्या प्रस्थापित नेत्यांसोबत चिवटपणे झुंज देत कार्यकर्त्यांनी हा पक्षविस्तार केला. ही झुंज आणि संघर्षाच्या अनेक रोमहर्षक आठवणी आणि नगर जिल्हा यांच्यातील नाते फार जुने आहे. आधी उपहास, नंतर संघर्ष आणि आता मान्यता हे तीन टप्पे पार करणा-या भाजपला सत्तास्थानी पोहचविण्यात नगर जिल्ह्यातील समर्पित नेते व कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
चाळीस वर्षापूर्वी शर्थीचे प्रयत्न करीत कार्यकर्त्यांनी शिर्डी ग्रामपंचायतीवर राज्यात पहिल्यांदा पक्षाचा झेंडा फडकविला. आज जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेत्यांच्या घरांवर कमळाचे झेंडे फडकत आहेत. या परिवर्तनात सुर्यभान वहाडणे, अण्णापाटील कदम, कृष्णराव बडदे, अॅड.राजाभाऊ झरकर, शंकरलाल जाजू, ल.का.देशपांडे आणि चंपालाल सांड यांच्या अनेक सारख्या समर्पित नेत्यांच्या त्याग आणि परिश्रमाचा मोलाचा वाटा आहे. अचूक रणनिती आणि संघटनेच्या जोरावर कोण एके काळी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात भाजपची कमळे फुलताना दिसत आहेत.
जिल्ह्यात जनसंघ आणि पुढे भाजप हा ज्याकाळी उपहासाचा विषय होता, त्याकाळात जुन्या मोटारसायकलवर बसून सुर्यभान वहाडणे वाड्यावस्त्यांवर पक्षविस्तारासाठी फिरायचे. ते पुढे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या कारकिर्दीत भाजप राज्यात पहिल्यांदा सत्तेत आला. राहूरीचे निष्ठावान व मातब्बरनेते अण्णापाटील कदम यांच्या देवळाली प्रवरा सहकारी सेवासंस्थेवर त्याकाळापासून पक्षाचे वर्चस्व राहीले. अॅड.राजाभाऊ झरकर संघटनमंत्री होते. त्यांनी गांवोगाव कार्यकर्ते उभे केले. रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, सुर्यभान वहाडणे, मोतीराम लहाने यांच्यानंतरची गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन ही जोडगोळी मैदानात आली. संघटन मंत्री व रणनितीकार वसंतराव भागवत यांनी पक्षाची फेरमांडणी केली.
माधवचा प्रयोग त्यांनी कमालीचा यशस्वी करून दाखविला. पदवीधर मतदारसंघातून प्रा.ना.स.फरांदे आमदार झाले. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे ही नवी जोडगोळी मैदानात आली. तोपर्यत पक्षवाढीसाठी जिल्ह्यात ज्ञानदेव खेतमाळस, बंडोपंत कुलकर्णी, विष्णूपंत देहडराय, तुळशीराम मुळे, वसंतराव चांदेकर, बाबूराव पुरोहित, दिलीप संकलेचा, आसाराम ढुस, चंद्रशेखर कदम, पी.डी.देशमुख, राधावल्लभ कासट, राधेशाम व्यास, रामदास खैरे अशा अनेक कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.
साखर सम्राटांच्या या जिल्ह्यात मुंडे महाजन जोडगोळीने फासे टाकायला सुरवात केली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा बसला. भिमराव बडदे यांच्या रूपाने जिल्ह्यात भाजपला पहिला खासदार मिळाला. पुढे दक्षिण नगरमध्ये दिलीप गांधी खासदार झाले. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात मुंडे यांनी पक्षाची मांड कधी पक्की केली हे कुणाच्या लक्षातही आले नाही. या जोडगोळीने पक्षाला राज्यात प्रमुख विरोधीपक्ष म्हणून स्थान मिळवून दिले. नंतर सत्तेत नेऊन बसविले. कोणे एकेकाळी काँग्रेसचे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यात भाजपने स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले.
काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात आणून बळ वाढविण्याची मुंडे महाजनांची निती यशस्वी झाली. तथापि केडर बेस पार्टी ही ओळख या पक्षाने आजही कायम ठेवली. बाहेरून आलेल्या नेत्यांवर विसंबून न रहाता, संघटनात्मक बांधणीला हा पक्ष सर्वाधिक महत्व देतो. यातच त्याचे वेगळेपण सामावले आहे.
नगर जिल्ह्यात जनसंघ आण पुढे भाजपचा प्रभाव असलेली मिरजगाव, बेलापूर, पुणतांबा आणि शिर्डी ही चारच गावे होती. आज जिल्ह्याच्या चारही बाजूला भाजपचा प्रभाव वाढतो आहे. जनसंघाच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यावेळचे खासदार अटलबिहारी वाजपेयी नगर जिल्ह्याच्या दौ-यावर होते. वहान न मिळाल्याने त्यांनी बेलापूर ते पढेगाव हा प्रवास बद्री शिंदे या कार्यकर्त्याच्या सायकलच्या नळीवर डबलसिट बसून केला. अशा अनेक सोनेरी आठवणी भाजपच्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जपून ठेवल्या आहेत. आजही भाजपत संघटनेला सर्वाधिक महत्व आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.