Paithan Pandharpur Highway :वारकऱ्यांची पालखी मार्गावर परीक्षा ; पैठण पंढरपूर पालखी मार्ग भूसंपादनाच्या फेऱ्यात

पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा या महिन्याच्या शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
Paithan - Pandharpur
Paithan - Pandharpursakal
Updated on

उद्धव देशमुख

बोधेगाव : पैठण येथील शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा या महिन्याच्या शेवटी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सहा वर्षांचा कालावधी लोटूनही पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे काम अपूर्णच आहे. यावर्षी देखील वारकऱ्यांना चिखलातून वाट काढत पंढरपूर गाठावे लागणार आहे.

शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांची पंढरपूरकडे जाणारी पायवाट सुकर व्हावी, यासाठी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बोधेगाव (ता. शेवगाव) मार्गे जाणाऱ्या पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गास मान्यता दिली. परंतु सहा वर्षांचा कालावधी लोटून देखील भूसंपादनांचे भिजत घोंगडे असल्याने जनतेतून प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त केला जात आहे.

आषाढी एकादशीला राज्यभरातील संतांच्या पालख्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. यामध्ये वाटकऱ्यांची पायवाट सुकर व्हावी, या उद्देशाने केंद्रीय मंत्री गडकरी यांनी रस्त्याला विशेष महत्त्व देत त्याला मंजुरी दिली.

त्यातील एक पैठण-पंढरपूर हा पालखी मार्ग. मात्र, ठेकेदार कंपनीकडून शेवगाव तालुक्यातील हातगाव, बोधेगाव, लाडजळगावातील कामे निम्म्याच्यावर पूर्ण करण्यात आली. परंतु मुंगी, शेकटे आणि बोधेगावातील काही ठिकाणी भूसंपादनाचा प्रश्न जैसे थे आहे.

डॉ. क्षितिज घुले, तसेच बोधेगाव येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अर्ज, उपोषणांची निवेदने देऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गेल्या वर्षी दिवाळीत मंत्री गडकरी यांनी मार्गाचे दिवाळीत काम पूर्ण करण्याचा शब्द दिला. मात्र, तो हवेत विरला.

जॉईंट मेजरमेंटनुसार आपण व्हॅल्युएशन करतो, इरिगेशनचे व्हॅल्युएशन झाले असून, आता भूसंपादनांची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात आहे.

- प्रसाद मते, प्रांताधिकारी

कालावधी संपूनही काम पूर्ण न झाल्याने जनतेला खड्डे आणि चिखलातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शासनाने सर्वसामान्य आणि प्रवाशांचे हित डोळ्यांसमोर ठेवून काम त्वरित पूर्ण करावे.

- डॉ. सतीश चव्हाण, ग्रामस्थ, बोधेगाव

बीड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील भूसंपादनाची प्रक्रिया पूर्णत्वाकडे आहे. परंतु शेवगाव तालुक्यातील सहा गावांतील भूसंपादनांचा अंतिम निवाडा अजूनही प्रांत कार्यालयाकडून प्राप्त झाला नसल्याने तो केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले नाही. मार्गाचे सत्तर टक्के काम पूर्ण झाले असून, येत्या डिसेंबरअखेर संपूर्ण काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.

- सूर्यकांत गलांडे, कार्यकारी अभियंता, पैठण-पंढरपूर पालखी मार्ग)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com