‘पंकजाशी माझे वैर नाही. मात्र, तिच्या जवळचे लोक चुकीचे वागतात. तिने आपला अहंकार कमी करावा,’ असा सल्ला नामदेवशास्त्री यांनी दिला.
पाथर्डी - ‘पंकजाशी माझे वैर नाही. मात्र, तिच्या जवळचे लोक चुकीचे वागतात. तिने आपला अहंकार कमी करावा,’ असा सल्ला नामदेवशास्त्री यांनी दिला, तर ‘कीर्तनाच्या मंचावर संतांनी राजकारण करू नये, मी मोठ्याने बोलले तर तो अहंकार आहे असे समजू नका. मी आजही स्वत:ला गडाची पायरी मानते,’ असे पंकजाने सांगितले. धनंजय मुंडे यांनीही, ‘पंकजा व मी एकच असून, तिच्या पायरीचा दगड व्हायला मी तयार आहे,’ सांगितले. या तिघांच्या जुगलबंदीला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार दाद दिली.
भारजवाडी येथील नारळी सप्ताहात भगवानगडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री, भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी केलेल्या राजकीय टीका-टिप्पणीमुळे हा धार्मिक कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.
भगवानबाबांनी सुरू केलेल्या ८९ व्या नारळी सप्ताहाची सांगता आज झाली. सुरवातीला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट देत शुभेच्छा देताना, या सप्ताहाचे आयोजन करण्याची संधी मला द्यावी, अशी विनंती नामदेवशास्त्री यांना करत ते मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी निघून गेले. त्यानंतर व्यासपीठावर मुंडे बंधू-भगिनी यांच्यासह आमदार मोनिका राजळे, बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, प्रताप ढाकणे आदी आले.
नामदेवशास्त्री म्हणाले, ‘पंकजाला मी मुलगी मानत असल्याने, तिचा दुस्वास करू शकत नाही. तिने स्वाभिमान बाळगायला हरकत नाही. धनंजय मुंडेंची आई ही गडाची भक्त होती. या गडावर धनंजय यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती, मात्र गडावरील बांधकामाला दगड देण्याचे भाग्य धनंजय यांच्या नशिबी आले. दहा एकर जमीन गडाला मिळावी म्हणून मी खूप प्रयत्न केले, मात्र हे काम धनंजय यांनी केले. गोपीनाथगडाला महंत नाही, मात्र भगवानगडाला महंत असल्याने हा गड टिकला. एखाद्याने गडासाठी पैसे दिले नाहीत तरी चालेल, मात्र येथील साधा चमचाही नेऊ देणार नाही. दोन्ही भावंडांनी मोठी भरारी घ्यावी, अशी माझी इच्छा आहे.’
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘भगवानगड माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे. मी गोपीनाथगडाचे लोकार्पण शास्त्री यांच्या हस्ते केले. येथून पुढे राजकारण याच गडावरून कर, असा सल्ला त्यांनी दिल्यानंतर मी हिरकणीसारखी गडावरून खाली आले. धनंजय व माझ्यात काहींनी भांडण लावले. ते कशासाठी, हे माहीत नाही, मात्र माझ्यासाठी जनता महंत आहे. मला गडाचे राजकारण करण्याची गरज नाही. सध्याचे सरकार चांगली मदत करत आहे. मी खूप गरीब आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला चुकीचे सांगितलेले दिसत आहे. आमच्यात लढाया लावणाऱ्यांना काय साध्य करायचे आहे, ते मला माहीत नाही.’
धनंजय मुंडे म्हणाले, ‘घरातील माणसांमध्ये संवाद असावा, असे वाटत होते, ते आज घडले आहे. माझ्यात व पंकजात सुईच्या टोकाइतकेही मतभेद नाहीत. गडाच्या बाबतीत जी जबाबदारी असेल ती बहीण-भाऊ म्हणून आम्ही पार पाडू.’
महाप्रसादाने सप्ताहाची समाप्ती झाली.
धनू मोठा झाला तर आनंदच!
गडाला माझ्या वतीने धनू मदत करेल. तो मोठा झाला तर मला आनंद आहे. गडावरील कामासाठी मी गवंडी म्हणून काम करीन, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
...म्हणून आम्ही आमदार-मंत्री बनलो
माझी नियतीवर श्रद्धा आहे. जे घडले, ते चांगले घडले. आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे झाल्याने दोघेही आमदार झालो व मंत्री झालो. एकत्र असतो तर असे घडले असते का, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
लक्षवेधी
आणखी तीन वर्षांनंतर आपण गडाचे महंतपद सोडणार असल्याचे नामदेवशास्त्री यांनी जाहीर केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी यावेळी २१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.