श्रीरामपूर ः शहरातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेवासे रस्ता, संगमनेर रस्ता, बेलापूर रस्ता, शिवाजी रस्ता, गोंधवणी रस्त्यासह दोन्ही कालव्यांनजीक विविध रस्त्यांवर अनेक ठिकाणी शेकडो खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यावर वाहनचालकांना कसरत करावी लागते.
नेवासे-संगमनेर रस्त्यावर दिवसभरात हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. त्यात अनेक मालवाहू मोटारींचा समावेश असतो. शहरातील रस्त्यांवरून होणारी अवजड वाहतूक खड्ड्यांना निमंत्रण देत असते. रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे लहान-मोठ्या अपघातांत वाढ झाली आहे. खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून पडतात. वाहनांचे नुकसान होते, तसेच चालकांचे मणकेही खिळखिळे होत आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना मानेचे आजार जडले आहेत.
पालिकेने अनेकदा खड्डे बुजविले. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले; परंतु खड्डे कायम आहेत. दर वर्षी पावसाळा आला, की शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून रस्ते खचतात. उन्हाळ्यात धुळीचा त्रास, तर पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांना सामोरे जावे लागते. अनेक पुलांवर पावसाचे पाणी काढण्यासाठी व्यवस्था नसल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी साचते.
आवश्य वाचा जिल्ह्यातील हिंडफिऱ्यांना 21 लाखांचा दंड
भरधाव वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर ते उडते. तक्रार करेपर्यंत वाहने निघून जातात. शहरातील रेल्वे भुयारी पुलाखाली नेहमी पाणी साचते. पाणी काढण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने वाहनचालकांना वाहने कशीबशी काढावी लागतात. खड्डे आणि खड्डेमय रस्ते, असे येथील कायमचे समीकरण झाले आहे. दत्त भुवनसमोरील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी काहींनी घरांच्या पाडकामाचे साहित्य आणून टाकले. त्यामुळे लहान वाहनांची अडचण झाली. पाणी साचल्याने दुचाकीस्वार घसरून पडतात. शिवाजी चौकातील वर्दळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे चारही बाजूंनी गतिरोधक उभारले. त्यांची उंची अधिक केल्याने, अनेकांची कोंडी होते. गोंधवणी रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक तयार केले असून, वाहतूक कोंडी वाढली आहे. शहरातील रस्त्यांची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे. अहमदनगर
संपादन - सूर्यकांत वरकड
....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.