नेवासे (नगर) ः नगर जिल्ह्याच्या साहित्य, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आदराने ज्यांच्या कुटुंबाचे नाव घेतलं जातं, ते म्हणजे गडाख पाटील कुटुंब. प्रशांत पाटील गडाख यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं तर राज्यातील सामान्यांसह नामांकीतांनाही कौतुक असतं. त्या प्रशांत पाटील यांच्या कौटुंबिक जीवनात गेल्या दोन महिन्यांपूर्वी एक दुःखद घटना घडली. त्या घटनेने त्यांच्यासह सर्वच निकटवर्तीय हेलावून गेले. काय झालं, कसं झालं, काय कारण असेल असे अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले.
या सगळ्या प्रश्नांना स्वतः प्रशांत गडाख पाटलांनीच एका पोस्टद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी गौरीच्या मृत्युमुळे मी उन्मळून पडलो आहे. नियतीनेच माझ्या आयुष्यात हे वाढून ठेवलं. इतर कोणत्याही संकटांपेक्षा हे संकट हेलावून टाकणारं होतं. काहींनी त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला. मी राजकारणात यायचं की नाही हे आता काळच ठरवेल, असं लिहित त्यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
ही पोस्ट लिहित असताना त्यांनी काही संकल्पही केले आहेत. ही पोस्ट म्हणजे उत्तम ललित लेखही ठरू शकते. त्यांनी दिवंगत पत्नी गौरी यांना लिहिलेलं पत्रही म्हणता येईल. आणि कार्यकर्त्यांना तो एक संदेशही आहे. या पोस्टमुळे जाणकारांच्या भुवयाही उंचावल्या आहेत.
त्यांनी सोशल मीडियातील पोस्ट जशीच्या तशी....
माझ्या आयुष्यात घडलेल्या अत्यंत वेदनादायी प्रसंगात मला धीर देण्यासाठी, माझं सांत्वन करण्यासाठी, तुम्ही सगळे आला होतात. त्यात राजकीय विरोध असणारे पण वेदना जाणारेही होते.परंतु माझी मनस्थिती तेंव्हा कुणालाही भेटण्याची नव्हती.त्याबद्दल सॉरी... माझी स्थिती तुम्ही नक्कीच समजून घ्याल.नियतीने माझ्या वाट्याला मरुस्तपर्यंत जे वेदनेचं गाठोड दिलं आहे,ते मला घेऊनच चालावं लागेल. 'वर्तमान जगायचंय मला' ही माझी कविता जी इतरांना प्रेरणा होती ती अशा रीतीने माझीच प्रेरणा होऊन बसेल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
राजकारणात, समाजकारणात, स्वतःच्या आयुष्यात यश-अपयश, कठीण प्रसंग खुप आले पण मी कधीही डगमगलो नाही.उलट त्यांना खंबीरपणे तोंड दिलं, लढलो... पण... गौरी तु मला हरवलं... माझा स्वभाव आलेल्या परिस्थितीशी लढण्याचा आहे, आता कुणाशी लढु..तु माझी पत्नी नव्हती तर आई, बहीण, मैत्रीण सगळं काही होती असं तुच मला म्हणायचीस ना.. तशीही तु मुडी होतीस, कधीकधी अचानक शांत राहायचीसं.. तु चेष्टेत मला म्हणायची कि, 'तुमच्याआधी मीच जाणार' पण तु अशी गेलीस की माझी आयुष्यभराची चेष्टा होऊन गेली.
साहेबांची सगळ्यात आवडती सुन नाही तर तु मुलगी, आपल्या नेहल, दुर्वा आणि मी .. आमचं काय चुकलं गं.. रोज रात्री झोपताना असं तुझ्याशी भांडतो मी.. माझा आवाज पोहोचतो का गं तुझ्यापर्यंत.. मला कोणाचीही सहानुभूती नको आहे पण एक नक्की की माझा नियतीवर भरवसा आहे.
ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल. अगदी कुणी रक्ताचं असलं तरी.. हा मला आत्मविश्वास आहे. गौरी मी घरी नव्हतो, तु निष्प्राण..आपल्या लहान मुलीने पाहिलं गं खिडकीतुन.. गौरी,तुला मी नेहमी म्हणायचो की, मी आहे तुझ्यामागे..
मी आता खरंच फकीर झालोय पण मला माझ्यासमोर माझ्या मुली,माझे वडील, माझ्यावर अवलंबून हजारो संसार दिसतात. मित्रांनो मी जरी तुमच्यात आलो तरी ही घटना मला एक दोन महिन्यात सावरू शकत नाही. प्लीज, माझी भावना तुम्ही समजून घ्याल.
मी स्वतःहुन ठामपणे सांगायचो की, मी राजकारणात येणार नाही पण माझ्या पत्नीच्या निधनात काहींनी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, आता काळच ठरवेल की मी राजकारणात यायचं कि नाही. पण माझ्या जिवलगांनो, तुम्ही मला जे बळ दिलं ते मी माझ्या आयुष्यभर विसरू शकत नाही.
कारण माझ्या आयुष्यात माझ्या दोन्ही मुली, माझे आई-वडील आणि तुम्ही सर्व जिवलग मित्र आहात.आपण भेटु,तेंव्हा कृपा करून, माझं सांत्वन करू नका, न विसरता येणारी ती घटना मला निदान तुमच्यात असताना विसरायची आहे. जेंव्हा भेटु तेंव्हा तुमचे काम सांगा, समाजाची कामे सांगा, नवनिर्मितीची चर्चा करा.तुमच्याशी व्यक्त व्हावसं वाटलं म्हणुन हात मोकळा झाला आणि माझं मनही...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.