हे... साहित्य झालय बरका महाग! 

Prices of surgical equipment increased
Prices of surgical equipment increased
Updated on

राहुरी : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्जिकल साहित्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एकदाच वापराच्या अत्यावश्‍यक साहित्याच्या किमती दुप्पट ते दहा पट वाढल्या आहेत. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन व स्वच्छता खर्च स्थिर आहे; परंतु लॉकडाउनमुळे आजारांचे प्रमाण नियंत्रित झाले. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात घटली. त्यामुळे ग्रामीण भागात दवाखान्यांच्या दैनंदिन खर्चाचा ताळमेळ हुकला आहे. "आमदनी अठन्नी; खर्चा रुपय्या' अशी परिस्थिती असल्याचे डॉक्‍टर सांगतात. 

मार्चमध्ये लॉकडाउन सुरू झाले. कोरोनाच्या भीतीने काही डॉक्‍टरांनी ओपीडी बंद केल्या. प्रशासनाने आवाहन केल्यावर डॉक्‍टरांनी दवाखाने सुरू केले. उपचार घेतलेला रुग्ण कोरोनाबाधित ठरल्यानंतर काही दवाखाने "सील' झाले. डॉक्‍टरांसह कर्मचारी क्वारंटाईन झाले. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या कोरोना महामारीत वैद्यकीय सेवा सुरू ठेवणारे डॉक्‍टर रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. डॉक्‍टरांनी मानवसेवा करावी, ही समाजाची अपेक्षा रास्त आहे; परंतु कोरोनामुळे डॉक्‍टरांनाही अनेक समस्यांनी ग्रासले आहे. विशेषतः दवाखाना सुरू ठेवताना दैनंदिन खर्च भागविणे कठीण होत आहे. 

ग्रामीण भागातील डॉक्‍टरांनी रुग्णांच्या तपासणी शुल्कात, शस्रक्रिया व आंतररुग्ण खर्चात वाढ केलेली नाही. लॉकडाउनमुळे नागरिक घरात अडकले. उन्हात फिरणे, हॉटेलिंग, उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे बंद झाले. त्यामुळे आजाराचे प्रमाण कमी झाले. शस्त्रक्रिया व दुर्धर आजाराव्यतिरिक्त किरकोळ आजाराचे रुग्ण कमी झाले. मात्र, रोज वापराच्या सर्जिकल साहित्याच्या किमती भडकल्या. त्यामुळे ग्रामीण भागात डॉक्‍टरांना दवाखाने सुरू ठेवणे जिकिरीचे झाले आहे. 

सर्जिकल साहित्य पूर्वी किंमत आताची किंमत (रुपयांत) 
फेस मास्क 2 25 
सर्जिकल कॅप 2.50 40 
एक्‍झामिनेशन ग्लोव्ह्‌ज 223 380 (शंभर नग) 
सर्जिकल ग्लोव्ह्‌ज 13.50 19.75 
स्पिरीट (650 मिलिलिटर) 45 60 
एन-95 मास्क 30 150 ते 200 
पीपीई किट 350 1200 ते 1800  

सर्जिकल साहित्याच्या भडकलेल्या किमतींवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्राच्या औषध नियंत्रकांनी डीपीसीयूमध्ये रोज वापराच्या अत्यावश्‍यक सर्जिकल साहित्याचा समावेश करावा. उत्पादनखर्च व नफ्याचे प्रमाण ठरवून, विक्रीची किंमत निश्‍चित करावी. सद्यःस्थितीत शासनातर्फे मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्‍टरांना नियंत्रित दरात सर्जिकल साहित्य उपलब्ध करून द्यावे. 
- डॉ. दिलीप कुलकर्णी, संजीवनी हॉस्पिटल, राहुरी 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.