शिर्डी: शिर्डी विधानसभा मतदारसंघातील गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची युती, असा सामना रंगणार आहे.
विखे पाटलांच्या होम ग्राऊंडवर हा सामना होत असल्याने, संपूर्ण जिल्ह्याचे त्याकडे लक्ष असणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने थोरात-कोल्हे युती हे नवे समीकरण आकारास आले. आज अर्जमाघारीच्या दिवशी नवे राजकीय संदर्भ असलेल्या या सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. शेतकरी संघटनेने सात ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत.
मागील आठ वर्षांपासून हा कारखाना विखे पाटलांनी त्यांच्या प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून चालविण्यास घेतला. या कारखान्याचा परिसर हे त्यांचे होम ग्राऊंड आहे. कारखान्यावर त्यांची सत्ता देखील आहे.
या निवडणुकीत त्यांनी बरेच नवे चेहरे उतरविले आहेत. विखे पाटलांबरोबरच खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे देखील या निवडणुकीत सक्रिय आहेत. गेल्या महिनाभरापासून त्यांनी या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केली होती.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा कारखाना चालविण्याचा करार पाच वर्षे वाढवीला. अर्थात त्यावर विरोधी गटाने आक्षेप घेत हा निवडणूक प्रचाराचा मुद्दा केला आहे.
स्थापनेपासूनच्या ६७ वर्षांच्या कालखंडात माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांच्या गटाकडे हा कारखाना सर्वाधिक अडतीस वर्षे होता. याच गटाकडून विखे पाटलांनी हा त्यावेळी बंद पडलेला कारखाना राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने चालविण्यास घेतला.
आजवर या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हे आणि विखे गटांत सातत्याने संघर्ष झाला. मात्र थोरात हे कधीही या निवडणुकीत सहभागी झाले नव्हते. यावेळी ते प्रथमच सक्रिय झालेत.
या निवडणुकीत कोल्हे गटाचे नेतृत्व कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे करीत आहेत. त्यांना अर्थातच थोरात यांचे उघड पाठबळ मिळाले आहे. हे दोघे मिळून विरोधी बाजूची प्रचार मोहीम राबवीत आहेत.
निवडणूक रिंगणातील उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे
शिर्डी गट- बाबासाहेब डांगे व बाबासाहेब मते (विखे गट), बाबासाहेब दादा डांगे, विजय दंडवते (थोरात-कोल्हे गट), भाऊसाहेब शिंदे (शेतकरी संघटना). राहाता गट- उत्तम डांगे, अनिल सदाफळ, पुंजाजी गमे (विखे गट), गंगाधर डांगे, नारायण कार्ले, संपत हिंगे (थोरात-कोल्हे गट). अस्तगाव गट- शिवनाथ घोरपडे, संजय नळे.
जालिंदर मुरादे (विखे गट), नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे (थोरात-कोल्हे गट), सतीश मोरे (शेतकरी संघटना). वाकडी गट- विशाल गोरे, राजेंद्र लहारे, संपत शेळके (विखे गट), अरुंधती फोफसे, सुधीर लहारे, विष्णुपंत शेळके (थोरात-कोल्हे गट). पुणतांबे गट- दत्तात्रय धनवटे, बाळासाहेब गाढवे (विखे गट).
संपत चौधरी, अनिल गाढवे (थोरात-कोल्हे गट), बापू धनवटे (अपक्ष), नानासाहेब गाढवे (शेतकरी संघटना). महिला मतदारसंघ- अनिता कोते, गयाबाई भंवर (विखे गट), कमलाबाई धनवटे, शोभाबाई गोंदकर (थोरात-कोल्हे गट), लक्ष्मीबाई गाढवे (शेतकरी संघटना), वैशाली क्षीरसागर (अपक्ष). इतर मागास मतदारसंघ- प्रकाश पुंड (विखे गट), अनिल टिळेकर(थोरात-कोल्हे गट), नारायण भुजबळ (अपक्ष).
अनुसूचित जाती- प्रदीप बनसोडे (विखे गट), अलेश कापसे (थोरात-कोल्हे गट). भटक्या विमुक्त जाती जमाती- संजय भाकरे (विखे गट), मधुकर सातव (थोरात-कोल्हे गट)
भगवंता मासाळ व अण्णासाहेब सातव (अपक्ष). ब वर्ग- ज्ञानदेव चोळके (विखे गट), सुधाकर जाधव(थोरात-कोल्हे गट).
आमदार काळे अलिप्त
कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे या निवडणुकीपासून आलिप्त आहेत, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विवेक कोल्हे हे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठबळासह ‘गणेश’च्या निवडणुकीचे नेतृत्व करीत आहेत. गणेश कारखाना निवडणुकीत सुमारे आठ हजार सभासद मतदानाचा हक्क बजावतील. १७ जून रोजी मतदान, तर १९ जून रोजी मतमोजणी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.