Latest Political News: आगामी विधानसभा निवडणुकीत मी श्रीगोंदेत लढावं, अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. किमान दौरा तरी करावा, असे त्यांना वाटत होते. पण, तसे केले असते, तर मी ज्या राहुरी मतदारसंघाचे नेतृत्व केले, तेथे चुकीचा संदेश गेला असता, तसेच ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते श्रीगोंद्यात आमच्या पक्षाचे (भाजप) आमदार आहेत. त्यामुळे तेथे लढण्याचा प्रश्न येतच नाही. मी राहुरीतूनच लढणार आहे, अशी भूमिका माजी मंत्री तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी मांडली.
कर्डिले यांनी आज कॉफी वुइथ सकाळ उपक्रमांतर्गत सकाळ टीमबरोबर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात महायुतीचा झालेला पराभव, जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांनी मनमोकळेपणे गप्पा मारल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतलेले आहे. जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे.