नेवासा : वाळू उपशाविरोधात घोगरगावमधील ग्रामस्थांनी अनेक निवेदने देऊनही प्रशासनाने कारवाई केली नाही. या प्रश्नात आमदार शंकरराव गडाख यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी थेट गोदावरी पात्रात जाऊन वाळूउपसा झालेल्या ठिकाणची पाहणी केलेली आहे, तसेच तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना घेराव घालून वाळूउपसा बंद करण्याची मागणी केली.
तालुक्यातील घोगरगाव येथे महादेव मंदिर परिसरातील गोदावरी नदीपात्रातून तब्बल १५ दिवसांपासून महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने चोवीस तास दररोज शेकडो डंपर जेसीबी व पोकलेन यांच्या साहाय्याने भरून वाळूतस्करांचा अवैध वाळूउपसा सुरू होता. अनेकवेळा ग्रामस्थ यांनी नेवासे तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्याकडे वाळूतस्करी बंद करण्यासाठी तक्रार करून निवेदने दिली.
परंतु यावर कुठलीही कारवाई महसूल व पोलिस प्रशासन यांनी केली नाही. उलट ग्रामस्थांना सांगितले सदर वाळूउपसा नेवासे तालुक्यातून होत नसून, गंगापूर हद्दीतून होत आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
या वाळूतस्करीचा वेग एवढा तीव्र होता की त्यामुळे घोगरगाव येथील नव्याने झालेले डांबरी रस्त्यावर सुद्धा ६ ते ७ फूट खोल खड्डे पडले असून, शाळेत जाणारे विद्यार्थी, ग्रामस्थ यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
घोगरगाव येथे कणगरे कुटुंबाचे रस्ता प्रश्नांवर सुरू असलेले उपोषण ६ दिवस उलटूनही तहसीलदार सोडण्यास आले नव्हते परंतु उपोषणकर्ते यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने सहा जुलै २०२४ रोजी तहसीलदारांनी भेट दिली.
त्याच वेळी घोगरगाव ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांना घेराव घालून वाळूउपसा चालू असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. यावेळी तहसीलदार व पोलिस यांच्या समक्ष वाळू तस्करांनी ग्रामस्थांवर दगडफेक करत जखमी केले. अंधाराचा फायदा घेत ग्रामस्थांनी आपली सुटका या वाळू तस्करांच्या हातून करून घेतली.
वाळूउपसा तातडीने बंद करण्यात यावा, ग्रामस्थांना संरक्षण मिळावे यासाठी आमदार शंकरराव गडाख यांनी घोगरगाव ग्रामस्थ व शेकडो कार्यकर्त्यांनी तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना घेराव घातला. हा वाळूउपसा बंद करण्याची मागणी केली.
अधिकारी यांना घेऊन ग्रामस्थांसह अवैध वाळूउपसा केलेल्या ठिकाणी घोगरगाव येथे धडक मारली व सदर वाळूउपसा करण्यासाठी त्या ठिकाणी करण्यात आलेले रस्ते तातडीने बंद करून वाळूउपसा कायमस्वरूपी बंद करावा. सदर वाळू तस्कर यांच्यापासून ग्रामस्थांना होणारा त्रास बंद व्हावा यासाठी गावात पोलिस बंदोबस्त ठेवावा, असे म्हणाले.
अवैध वाळू उपशा विरोधात घोगरगाव ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्यात नेहमी पाठीशी राहून सर्वतोपरी सहकार्य करू, असे सांगितले. सर्वसामान्य नागरिक यांनी कुणाच्याही भीतीला बळी पडू नये, काही अडचण वाटल्यास थेट संपर्क करावा, असे सांगत ग्रामस्थांना या लढ्यात बळ दिले. वाळूउपसा विरोधात ग्रामस्थांनी पुकारलेल्या लढ्यात पाठबळ देऊन सहकार्य केल्याबद्दल आमदार गडाख यांचे घोगरगाव ग्रामस्थांनी आभार मानले.
सदर वाळूउपसा झालेला पंचनामा करून पुढील कार्यवाही केली जाईल. वाळूउपसा करण्यात येणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे.
- संजय बिराजदार, तहसीलदार
घोगरगावमधील ग्रामस्थांना धमकावणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
- धनंजय जाधव,निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.