Sangamner: अधिकारी झाल्याशिवाय गावाकडे फिरकायचे नाही, अशी खूणगाठ मनात बांधली. घर सोडलं. शहरात राहून फळे विकली. खानावळ चालवून खर्च भागविला. हे करताना स्पर्धा परीक्षा देत राहिला. केवळ तीन वर्षांत तो अधिकारी झाला.
आता गावात त्याच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे, ही कथा आहे नांदूर खंदरमाळ (ता. संगमनेर) येथील विकास मोरे या तरुणाची.
नांदूर खंदरमाळ गावाअंतर्गत असलेल्या मोरेवाडी येथील मनाजी मोरे या शेतकरी कुटुंबात विकासचा जन्म झाला. या भागात दुष्काळी स्थिती. त्यावर मात करण्यासाठी अनेक जण नोकरी व व्यवसायाठी बाहेर पडतात. असेच अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन विकासही बाहेर पडला. पुण्यात जाऊन त्याने स्पर्धा परीक्षा दिल्या.
खर्चाला पैसे हवे होते. प्रारंभी फळांचे दुकान लावले. त्याला जोड म्हणून जेवणाचे डबे तयार करून देऊ लागला. अशी सगळी जबाबदारी निभावताना अभ्यास सुरूच होता. कामे उरकल्यावर तो वाचनालयात जायचा. काहीही झालं तरी मी पोलिस उपनिरीक्षक होणारच, अशी खूणगाठच मनाशी बांधली होती.
दोनदा अपयश आले, नंतर मात्र त्याने यशाला गवसणी घातली. पोलिस उपनिरीक्षक झाला. या यशात त्याला वडील मनाजी, आई सुरेखा, पत्नी चैताली, भाऊ शरद यांची मोलाची साथ लाभली. मित्रपरिवार, गावकरी आणि नातलग असे सगळेच त्याच्या स्वागताची तयारी करीत आहेत.
जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपल्याजवळ जिद्द, चिकाटी आणि खूप मेहनत करण्याची तयारी असावी लागते. मी अधिकारी व्हावे, असे वडिलांचे स्वप्न होते. ते मी पूर्ण करू शकलो. याचे मला समाधान आहे.
- विकास मोरे, मोरेवाडी
आम्हाला आठवण झाली की आम्ही विकासला भेटण्यासाठी आळेफाटा येथे जायचो. तो जिद्दी आहे. त्याने आज आमचे स्वप्न पूर्ण केले. आमच्या परिवाराच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
- मनाजी मोरे, मोरेवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.