शिर्डी (अहमदनगर) : देश-विदेशात कीर्ती झालेल्या साईबाबांच्या चरित्राच्या प्रकाशनास शुक्रवारी 90 वर्षे पूर्ण झाले. दक्षिण भारतात महाराष्ट्रातील एखाद्या संतांचे सर्वाधिक मागणी असलेला चरित्रग्रंथ म्हणून साईचरित्राची ओळख आहे. विशेष म्हणजे, या ग्रंथाचा मराठी भाषेतील खप तुलनेत कमी आणि दक्षिण भारताच्या विविध राज्यांतील खप विक्रमी आहे. परदेशातील भाविकांत इंग्रजीतील साईचरित्राला मोठी मागणी आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून सरकार आणि साईसंस्थान या ग्रंथाकडे पाहत नाही, हे दुर्दैव !
साईसंस्थानच्या प्रकाशन विभागातून, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व कर्नाटकात अनुक्रमे तेलगू, तमिळ, कन्नड व इंग्रजीतील प्रत्येकी सुमारे 40-50 हजार ग्रंथ दरवर्षी विकले जातात. अण्णासाहेब दाभोळकरांनी 1930 मध्ये साईबाबांच्या हयातीत या ग्रंथाची मराठी भाषेत रचना केली. एकूण 16 भाषेत या ग्रंथाचे भाषांतर करण्यात आले. त्यात दरवर्षी नव्या भाषांतील अनुवादित ग्रंथांची भर पडते. साईबाबांचे भक्त दक्षिण भारतात अधिक आहेत. त्यामुळे तिकडे या ग्रंथाला सर्वाधिक मागणी आहे. जगाच्या शंभरांहून अधिक देशात साईचरित्र जाऊन पोचले.
साईबाबांच्या आयुष्यात शिर्डीत घडलेल्या अनेक घटनांची नोंद या ग्रंथात आहे. गोदातिरी असलेल्या साईनगरीत बाबांनी व्यतीत केलेल्या आयुष्याचे चित्रण आहे. जगभरातील लाखो भाविकांसमोर या ग्रंथाच्या निमित्ताने शिर्डीची महती पोचली. हा ग्रंथ प्रकाशित झाला, त्यावेळी त्याची किंमत अडीच रुपये होती. आजही साईसंस्थानतर्फे 90 रुपये सवलतीच्या दरात त्याची विक्री होते. दोन वर्षांपूर्वी 16 भाषांत अनुवादीत झालेल्या या ग्रंथाच्या सुमारे पाच लाख प्रती मुद्रित करण्यात आल्या होत्या. त्या आता संपत आल्या आहेत.
ग्रंथास 90 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येथील भाविकांनी ग्रंथपूजन केले. माजी उपनगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व उद्योजक दिलीप गोंदकर यांच्या हस्ते सपत्नीक ग्रंथाची पूजा करण्यात आली. दिलीप संकलेचा, संतोष खेडलेकर, रमेश बिडये, शब्बीर सय्यद, ज्ञानेश्वर लंबोळे, गणेश जाधव आदी उपस्थितीत होते. पंकज जोशी यांनी पौरोहित्य केले.
मूळ प्रत साईसंस्थानाकडे
90 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेली साईचरित्र ग्रंथाची मूळ प्रत साईसंस्थानकडे आहे. त्याआधारे मराठीसह सर्व भाषांतील साई चरित्रग्रंथाची पडताळणी करणे गरजेचे आहे. मात्र, साईसंस्थानकडे त्यासाठी स्वतंत्र विभाग नाही. सर्वाधिक खपाच्या या ग्रंथाची देशाच्या विविध राज्यात व परदेशात सामुहिक पारायणे होतात. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव ठरलेला ग्रंथ व त्यातील घटना आणि स्थळांच्या आधारे धार्मिक पर्यटनाला चालना देण्याचा कुठलाही कार्यक्रम सरकार, संस्थानकडे नाही.
संपादन - सुस्मिता वडतिले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.