अकोले : जिद्द, चिकाटी आणि परिश्रम याला आत्मविश्वासाची जोड देत आपले एस टी चालकाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अकोले तालुक्यातील जामगाव या खेड्यातील सोनाली संदीप उंबरे या आदिवासी महिलेची अकोले आगारात चालक पदी नियुक्ती झाली. एसटीचे चाक एका महिलेच्या हाती घेण्याचा पहिल्या महिलेची नियुक्ती झाल्याचा मानही सोनालीला मिळाला.
प्रशिक्षण ते नियुक्ती या आपल्या चालकपदापर्यंतचा प्रवास मांडताना सोनाली यांनी सांगितले की महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असतानाच २००८-०९ मध्ये आदिवासी विकास विभागाच्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रात मी प्रवेश घेतला. माझा आतमविश्वास आणि आई वडिलांची साथ मिळाल्यामुळे अकोले येथील या केंद्रात मी दाखल झाले. प्रशिक्षण पूर्ण करत असतानाच आम्हाला लर्निग ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यास सांगितले होते.
त्यानुसार मी हे लायसन काढले. २०१७ मध्ये माझा विवाह जामगाव येथील संदीप उंबरे यांच्या बरोबर झाला.२०१८ मध्ये मी एस टी महामंडळाच्या चालक पदासाठी अर्ज करू काय या बाबत माझे पती संदीप यांना विचारले. त्यांनी यासाठी परवानगी तर दिलीच पण या बरोबरच माझा आत्मविश्वास वाढविला आणि मी या पदासाठी अर्ज केला व माझी निवडही झाली.
२०१९-२० मध्ये आम्हा मुलींच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण औंरगाबाद येथे सुरू झाले. मात्र यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि प्रशिक्षण बंद झाले. पुन्हा मुंबई येथे आमचे प्रशिक्षण सुरू झाले. मात्र आम्हाला मुंबई दूर पडते आ्हाला नाशिक येथे प्रशिक्षण द्यावे अशी मागणी आम्ही सर्वांनी केली आणि या नुसार आमचे वर्षभराचे प्रशिक्षण नाशिक येथे पूर्ण झाले.
घर, प्रपंच सांभाळत अगदी तारेवरची कसरत या कालावधीत करावी लागली. मात्र पतीचा विश्वास आणि त्यांच्या बरोबरीने आई वडील आणि भाऊ यांची साथ या वेळी मला मिळाली आणि मी हा टप्पा पूर्ण केला.
एसटीच्या अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले असतानाच माझ्या गावाजवळील तालुक्याच्या ठिकाणी माझी चालक पदी नियुक्ती झाल्यामुळे मला आणि पती संदीप व परिवाराला खूप आनंद झाला आहे, या माध्यमातून मला माझ्या तालुक्यातील प्रवाशी नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली.
ही सेवा आपण प्रामाणिकपणे करणार असल्याचे सांगतानाच या माध्यमातून मी माझ्या अकोले तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व मुलींना आवाहन करू इच्छिते की आपल्या अंगी असलेल्या जिद्द आणि चिकाटीला आत्मविश्वासाची जोड दिल्यास यश आपल्या पाठीशी उभे राहते. प्रयत्न करत रहा यश हमखास मिळते असा विश्वास जागवत सोनालीने आम्ही आदिवासी कन्याही मागे नसल्याचा एक आदर्श इतर तरुनाई समोर घालून दिला.लवकरच जामगाव ग्रामस्थ व पत्रकार संघातर्फे सौ.सोनाली संदीप उंबरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.