Start up : भरडधान्याची सातासमुद्रापार भरारी

उद्योजिका फडतरेंना एक लाखाचा पुरस्कार; पारंपरिक गृहितकाला छेद देत विविध पदार्थ बनविले
Start up
Start upsakal
Updated on

राहुरी : देवळाली प्रवरा येथील सरोजिनी तात्यासाहेब फडतरे यांच्या ‘स्टार्ट-अप’च्या उत्पादनांनी सातासमुद्रापार भरारी घेतली. त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपयांचा ‘उत्कृष्ट स्टार्ट-अप’ पुरस्कार’ राज्यपालांच्या हस्ते मिळाला.

ज्वारी, बाजरी व नाचणी या भरडधान्यांपासून फक्त भाकरी बनविता येते, या पारंपरिक गृहितकाला छेद देत, या धान्यांपासून पोहे, चिवडा, रवा, इडली-डोसा पीठ, चकली, शंकरपाळी आदी विविध आरोग्यवर्धक पदार्थ बनविण्याची वेगळी संकल्पना घेऊन, नवउद्योजिका सरोजिनी फडतरे यांनी देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे उद्योग सुरू केला.

महाराष्ट्र शासनातर्फे १५ ऑगस्ट २०२२ ते १७ सप्टेंबर २०२२ दरम्यान राज्यात ‘महाराष्ट्र स्टार्ट-अप’ यात्रेचे आयोजन केले. नवउद्योजकांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा शोध घेऊन त्यांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, निधी आणि आवश्यक पाठबळ पुरवणे हा या ‘स्टार्ट-अप’ यात्रेचा उद्देश होता.

या ‘स्टार्ट-अप’ यात्रेत महिला नवउद्योजक गटामध्ये सरोजिनी फडतरे यांच्या ‘मिलेट ट्रॅडिशनल फूड फॉर हेल्थ’ या संकल्पनेवर आधारित ‘स्टार्ट-अप’ उद्योगाला राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा एक लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. मुंबई येथे १८ ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा झाला.

फडतरे यांचा देवळाली प्रवरात ‘समृद्धी ॲग्रो ग्रुप’ या नावाने धान्यप्रक्रिया उद्योग आहे. या उद्योगाच्या माध्यमातून ज्वारीचा रवा, पोहे, इडली मिक्स, ज्वारी चिवडा, बाजरी पोहे, नाचणी रवा, इडली व डोसा मिक्स, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ आदी उत्पादने घेण्यात येतात. सर्व उत्पादनांची गुणवत्ता चांगली असल्याने त्यांना भारताबाहेर अमेरिका, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, दुबई, दक्षिण आफ्रिका या ठिकाणी बाजारपेठ मिळाली आहे. आता मिश्र धान्यांचे ‘कुरकुरे’ उत्पादनही सुरू केले आहे.

या पदार्थांच्या विक्रीसाठी देवळाली प्रवरात ‘मॉल’ही सुरू केला आहे. ऑनलाइन विक्रीसाठी ‘गुड टू इट’ या नावाने ब्रँडविकसित केला आहे. सरोजिनींना कृषी पदवीधर असलेले त्यांचे पती तात्यासाहेब फडतरे यांचीही मदत होत आहे. फडतरे स्वत: गृहविज्ञान शाखेच्या पदवीधर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.