नगर : सावेडी उपनगरातील तपोवन रस्ता पहिल्याच पावसात खचताच, महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व स्थानिक नगरसेवकांनी रस्त्याची पाहणी केली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा दिला होता. तसेच आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तपोवन रस्त्याच्या कामाबाबत तक्रार केली होती. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागपूर येथील एक पथक नगर शहरात दाखल झाले.
पहिल्याच पावसात तपोवन रस्ता खचल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्य केले. तसेच, हा रस्ता डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण करून देण्याचे व तोपर्यंत ठेकेदाराला कामाचे बिल देण्यात येणार नसल्याचे लेखी आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बारस्कर यांना दिले होते. त्यानुसार हे पथक रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले आहे. या पथकात चार अधिकारी आहेत. हे पथक तीन दिवस नगर शहरात राहणार आहे. पथकाने आज दुपारी 12 वाजताच्या सुमारास तपोवन रस्त्याला भेट दिली. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थानिक नगरसेवक डॉ. सागर बोरूडे, विनित पाऊलबुधे, सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते.
काय आहे प्रकरण
आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे पाच किलोमीटरच्या तपोवन रस्त्यासाठी तीन कोटी 15 लाख 58 हजार रुपये मंजूर करून आणले होते. या रस्त्याचे काम महिनाभरापूर्वी पूर्ण झाले. पहिल्याच पावसात या रस्त्यावरील डांबर वाहून गेल्याचे निदर्शनास आल्याने, संपत बारस्कर व स्थानिक नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या कामासंदर्भात नाराजी व्यक्त करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी बारस्कर यांना लेखी आश्वासन दिले होते. या पत्रात म्हटले होत, की हे काम आर. एच. दरे या ठेकेदार कंपनीला देण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाहणी केली असता, रस्त्याच्या कामातील काही भाग खचला आहे. ठेकेदाराला कामाच्या निविदेतच या रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्यास सांगितले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची निरीक्षणे करून डिसेंबर अखेरपर्यंत रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे पूर्ण करून देण्यात येईल. त्यामुळे आपण आंदोलन रद्द करावे, अशी विनंती कार्यकारी अभियंत्यांनी पत्रात केली होती. त्यानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले होते. या रस्त्या संदर्भात आमदार संग्राम जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.