साई संस्थानच्या नव्या मंडळापुढे पात्रतेचे आव्हान

साईबाबा
साईबाबा
Updated on
Summary

या पार्श्वभूमीवर साईसंस्थानवर नियुक्त झालेल्या नव्या मंडळालाही निवडीच्या पात्रता व निकष पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. तोपर्यंत या मंडळाच्या नियुक्तीला शाश्वती लाभणार नाही.

शिर्डी ः निकष व पात्रतेच्या अटी पूर्ण न केल्याने यापूर्वी काँग्रेस आघाडी सरकारने साईसंस्थानवर नियुक्त केलेले मंडळ अवघ्या चोवीस तासांत घरी गेल्याचा इतिहास ताजा आहे. भाजप शिवसेना युतीच्या काळातील मंडळाला याच मुद्यावर अवघ्या दीड वर्षात आपले अधिकार गमवावे लागले होते.

या पार्श्वभूमीवर साईसंस्थानवर नियुक्त झालेल्या नव्या मंडळालाही निवडीच्या पात्रता व निकष पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारावे लागेल. तोपर्यंत या मंडळाच्या नियुक्तीला शाश्वती लाभणार नाही.

साईबाबा
भाजप सरकारने मला नि कुटुंबालाही छळलं, मंत्र्यांचा गौप्यस्फोट

या मंडळात आठ विश्वस्त कुठल्या ना कुठल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे गरजेचे आहे. एक महिला व एक अर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सदस्य, तर अन्य सात विश्वस्त पदवीधर व नगर जिल्ह्यातील रहिवासी असावेत, असे निकष आहेत. त्यांच्यावर फौजदारी व नैतिक अधःपतनाचे गुन्हे नसावेत, ही आणखी एक महत्वाची अट आहे.

या पूर्वीच्या दोन्ही मंडळाच्या विरोधात त्या आधारे न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले. पात्रतेच्या अटी व नियमांचा भंग झाल्याने एक मंडळ एका दिवसात घरी गेले, तर दुसरे दीड वर्षात आपला अधिकार गमावून बसले होते. आता महाविकास आघाडीने नियुक्त केलेल्या मंडळाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मंडळातील आठ विश्वस्त आपआपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत का, त्या-त्या क्षेत्रात दहा वर्षे काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे का, कुणावर गुन्हे दाखल आहेत का, ही सर्व मंडळी पदवीधर आहे का, याची खातरजमा करून हे मंडळ नियुक्त करण्याची काळजी राज्य सरकारने केली असावी. अन्यथा यापूर्वीचा अनुभव लक्षात घेता, या निवडीला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.

काळेंच्या नावाला हिरवा कंदील

साई संस्थानच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नावास काल सायंकाळी हिरवा कंदिल दाखविल्याचे समजते. ‘सकाळ'ने गेल्या शुक्रवारच्या (ता. १८) अंकात ते अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत, असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब झाले. काळे यांचे नाव पक्षाने नक्की केल्याचे वृत्त समजताच, कोपरगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आपला आनंद साजरा केला. आज विधी व न्याय विभागाकडून अध्यक्ष व विश्वस्तांच्या नावाची यादी अधिकृतपणे जाहीर केली जाईल.

काळे हे कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अमेरिकेतून आभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेले काळे मागील विधानसभा निवडणुकीत तरूण वयात आमदार झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गुड बुकमधील युवा आमदार म्हणून ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्तुळात परिचित आहेत. त्यांची कामाची पध्दत व माजी खासदार कै. शंकरराव काळे यांचा वारसा लक्षात घेऊन पवार यांनी त्यांची यापूर्वी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आता साईसंस्थानचे अध्यक्षपदासाठी त्यांच्या नाव निश्चित करून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला.

साईसंस्थानवर विश्वस्त मंडळ नियुक्त करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच दिले होते. आदेशाकडे दुर्लक्ष झाल्यास अवमानतेची कारवाई करण्याचा तोंडी इशारा न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. आज (ता. २३) यावरील जनहित याचिकेची सुनावणी होणार आहे. त्यात याबाबत राज्य सरकारला खुलासा करून त्याबाबत न्यायालयात भूमिका मांडावी लागणार होती. हे लक्षात घेऊन तातडीने या हालचाली करण्यात आल्या.

म्हणून फटाके वाजले

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठनेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील या सर्वांनी आमदार आशुतोष काळे यांना साईसंस्थानचे अध्यक्ष या नात्याने काम करण्याची संधी देण्याचे नक्की केले. हे कळताच कोपरगाव विधानसभा मतदारसंघात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा झाला. समाजहिताला प्राधान्य देण्याचा आजोबा माजी खासदार कै. शंकरराव काळे, वडील आमदार अशोक काळे यांचा वारसा ते पुढे चालवतील.

- बाबासाहेब कोते, अध्यक्ष गौतम बॅंक, कोपरगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.