Vidhansabha Election : महाविकास आघाडी शिर्डीत फुंकणार रणशिंग

विधानसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे रणशींग फुंकले जाईल.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

शिर्डी - नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीत कडवी झुंज देणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या राहाता तालुक्यातील समर्थक पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. पवारांनी या भेटीला सकारात्मक प्रतिसाद दिला. शिर्डीत मेळावा आयोजित करा आपण स्वतः उपस्थित राहू, असे आश्‍वासन दिले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या.

पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या या नियोजित मेळाव्याची तारीख लवकरच निश्चित होईल. तसे झाले तर विधानसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे रणशींग फुंकले जाईल. हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बॅनरखाली होईल.

मेळाव्याचे आयोजक मात्र सध्या भाजपत असलेल्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचे खंदे समर्थक असतील. मागील वर्षी पार पडलेल्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत याच समर्थकांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व युवानेते कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाचा पराभव केला होता.

आता पवारांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे गणेशवर सत्ता असलेले कोल्हे या मेळाव्याबाबत नेमकी काय भूमिका घेतील, याबाबत देखील उत्सुकता निर्माण झाली आहे. ही भेट गणेश परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दादाभाऊ कळमकर आणि पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदिप वर्पे यांच्या पुढाकारातून ही भेट झाली. याभेटीत कोल्हे गटाचे गणेशचे माजी अध्यक्ष ॲड. नारायण कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, आप्पासाहेब बोठे, उद्योजक महेंद्र शेळके, संचालक नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, संपत हिंगे, अनिल बोठे, सुधीर म्हस्के आदींचा समावेश होता.

या भेटीबाबत ‘सकाळ’ शी बोलताना कार्ले म्हणाले, पवार यांनी गणेश कारखाना, उसाची आणि पाण्याच्या परिस्थितीबाबत विचारणा केली. प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत ज्येष्ठनेते आमदार बाळासाहेब थोरात व युवानेते विवेक कोल्हे यांनी पहिला गळीत हंगाम यशस्वी केला. मात्र जिल्हा बॅंकेकडून अडवणुक करण्यात आली. चाळीस कोटी रूपयांचे कर्ज अडवण्यात आले. अशी माहिती आम्ही त्यांना दिली.

शेतीच्या पाण्याचा प्रश्न, गोदावरी कालव्यांची दुरावस्था, दुधउत्पादकांचे सुरू असलेले हाल अशा विविध समस्या त्यांच्यासमोर मांडला. आमच्या भेटीला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी शिर्डीत मेळावा आयोजित करा, आपण स्वतः उपस्थित राहू. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेऊन मेळाव्याची तारीख निश्चित करा, अशा सूचना दिल्या.

आम्ही सर्वजण युवानेते विवेक कोल्हे यांचे समर्थक आहोत. ज्येष्ठनेते खासदार शरद पवार यांची आम्ही सदिच्छा भेट घेतली. त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून पहाणे योग्य ठरणार नाही. आम्ही त्यांच्या समोर गणेश कारखाना आणि तालुक्यातील जनतेच्या अडचणी मांडल्या. आमच्या विनंतीवरून त्यांनी राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माध्मातून शेतकरी मेळावा आयोजित करण्याच्या सुचना दिल्या. ते स्वतः या मेळाव्यास उपस्थित रहाणार आहेत.

- ॲड. नारायण कार्ले, माजी अध्यक्ष, श्रीगणेश सहकारी साखर कारखाना, राहाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.