अहमदनगर : पाणी द्या पाणी !

पाणीप्रश्‍नी केडगाव, कल्याण रोड, गुलमोहर रोडचे नगरसेवक आक्रमक
water scarcity
water scarcitysakal media
Updated on

अहमदनगर : महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांत पाणीप्रश्न गंभीर होऊ लागला आहे. बहुतेक ठिकाणी पाण्यासाठी नगरसेवक आक्रमक झाले आहेत. केडगावचे पाणी एका सोसायटीला वळविल्याने ८० हजार नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कल्याण रोडवर पाण्याची बोंब आहे, तर गुलमोहर रोड परिसरातील नगरसेवक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

उन्हाची तीव्रता वाढल्याने नागरिकांना पाण्याची गरजही जास्त लागत आहे. महापालिकेकडे नोंदणी केलेल्या नळ कनेक्शनपेक्षा मोठ्या आकाराच्या पाइपद्वारे काही ठिकाणाहून पाणी मुख्य वाहिनीतून घेतले जात असल्याने उर्वरित भागाला पाणी कमी मिळते. पाणी सोडणाऱ्यांच्या अनियमितपणाचा फटका अनेकांना बसतो. अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.

गुलमोहर परिसरात पाण्याचा बट्ट्याबोळ

महापालिकेच्या प्रभाग चारमधील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. तो तातडीने दुरुस्त करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा नगरसेविका ज्योती गाडे यांनी दिला आहे.गुलमोहर रस्ता परिसरातील एकता कॉलनी, कविजंगनगर, सावली सोसायटी, नवलेनगर, जयश्री कॉलनी व फकीरवाडा परिसरातील गौरवनगर भागात मागच्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. अनेक वेळा नागरिक व मी स्वतः पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास सदर समस्या आणली आहे, मात्र अजूनपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर व बोअरवेलवर अवलंबून राहावे लागत आहे. या परिसरातील पाणीपुरवठा एका आठवड्यात सुरळीत झाला नाही, तर परिसरातील नागरिकांसह आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गाडे यांनी दिला.

कल्याण रोडला पाणी केव्हा मिळणार?

कल्याण रोड परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. तेथे पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी तीन ते चार दिवसांनी येते. या परिसरात नव्याने अनेक कॉलनी झाल्या आहेत. पाणीच देणार नसाल, तर नवीन कॉलनीला परवानगी का दिली जाते, असा प्रश्न तेथील नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. या परिसरातील महिलांनी यापूर्वी पाण्यासाठी मनपावर आंदोलने केली होती. तशी वेळ पुन्हा येऊ देऊ नका, असे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना बजावले आहे.

केडगावमधील पाणी इतरत्र वळविले

केडगावचे शिवसेनेचे नगरसेवक विजय पठारे व अमोल येवले यांनी केडगावचे हक्काचे पाणी मिळत नसल्याचा प्रश्‍न उपस्थित करून केडगावला दिले जाणारे पाणी नगर-कल्याण रोडवरील ड्रीम सिटी या अपार्टमेंटला दिल्याचे निदर्शनास आणून दिले. केडगावला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बायपास रोडवरून जाते. या रोडवरच ड्रीम सिटी हा बांधकाम प्रकल्प आहे.

केडगावला पाण्यापासून वंचित ठेवून ५०० घरांसाठी केडगावच्या ८० हजार लोकांना वेठीस धरले जाते, असा आरोप नगरसेवक पठारे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मनपा सभेत प्रश्न उपस्थित केला होता. संबंधित अपार्टमेंटला केवळ एक इंची जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यावर नगरसेवकांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता या जलवाहिनीतून जादा मोठे पाइपद्वारे पाणी पाणी दिले जात असल्याचे पठारे यांच्या निदर्शनास आले. तसेच हे पाणी चोवीस तास सुरू असल्याने केडगावकरांना पाणी मिळत नाही.

यामुळे अनियमित पाणीपुरवठा

  • अनधिकृत नळजोड

  • उपनगरांत नवीन बांधकामे, पण मुख्य वाहिनी जुनीच

  • कमी क्षमतेच्या वाहिनीला नव्याने अनेक नळजोड

  • नवीन कॉलनीला व्हॉल्व्हमनकडून झुकते माप

  • वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या

  • अवेळी विजेमुळे पंपिंग कमी

  • उन्हामुळे जादा पाणीवापर

गुलमोहर रोड परिसरातील बहुतेक लोक घरपट्टी, पाणीपट्टी वेळेत भरतात. नोकरी करणारे अनेक जण आहेत. महापालिकेला कायम त्यांचे सहकार्य असते. या भागातील पाणीपुरवठा विस्कळित झाल्यास त्यांची मोठी अडचण होते. गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरेशा दाबाने मिळत नाही. मनपाने दखल घेतली नाही, तर आंदोलन करू.

- ज्योती गाडे, नगरसेविका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.