राहुरी - मुळा धरणाच्या मूळ आराखड्यात सिंचनासाठी राखीव २० टीएमसी पाणी आता १३ टीएमसीवर आले आहे. मागील ५० वर्षांत तब्बल ७ टीएमसी सिंचनाच्या पाण्यावर गंडांतर आले आहे. बिगर सिंचनाच्या पाण्याची मागणी वाढतच आहे. भविष्यात मुळा धरण फक्त पिण्याच्या व औद्योगिक वापरासाठी राखीव झाल्यास नवल वाटू नये. त्यामुळे सिंचनाचे पाणी पुनर्स्थापित करणे काळाची गरज झाली आहे. अन्यथा हे पाणी ‘पेटल्या’शिवाय राहणार नाही.
मुळा धरणात १९७२ साली पाणी साठवण्यास सुरुवात झाली. धरणाच्या मूळ आराखड्यात उपयुक्त पाणीसाठा २१.५ टीएमसी, बाष्पीभवन २.७० टीएमसी, बिगर सिंचन (पिण्याचे व औद्योगिक पाणी) २.०८८ टीएमसी, शेती सिंचनासाठी २०.०९६ टीएमसी असा पाणी वापर होता. त्यानुसार, धरणाची निर्मिती सिंचनाच्या पाण्यासाठी झाल्याचे दिसते; परंतु आता प्राधान्यक्रम बदलला आहे.
मागील ५० वर्षात धरणात सुमारे दीड टीएमसी गाळ साचला. धरणसाठा २६ टीएमसी वरुन २४.५ टीएमसी असा नैसर्गिकपणे घटला. लोकसंख्या वाढ, नागरीकरण, थेट धरणातून वाढलेल्या पाणी योजना, नगर-सुपा औद्योगिक वसाहतीपर्यंत गेलेले पाणी, असा पिण्याचा व औद्योगिक पाणी वापर वाढला. जलसंपदाच्या कागदोपत्री बिगर सिंचनासाठी दाखविल्यापेक्षा प्रत्यक्षात दुप्पट पाणी वापर होतो. असे चित्र आहे. त्याचा थेट परिणाम सिंचनाच्या पाण्यावर झाला आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिक करणामुळे पाण्याची मागणी वाढतच आहे. त्यामुळे राखीव साठ्यात वाढ होत आहे. साहजिकच ज्यांच्या जमिनी धरणाखाली गेल्या, त्या भागातील तसेच धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी भविष्यात वाद घालू शकतील. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या नाही, तर हे पाणी पेटणार, असे भीती तज्ज्ञांना वाटते.
५० वर्षात भरले २० वेळा
धरण ५० वर्षात २० वेळा पूर्ण क्षमतेने भरले. लाभक्षेत्रात व पाणलोटात चांगला पाऊस झाला. धरण भरले. जायकवाडीला पाणी सोडावे लागले नाही. तरच सिंचनाची तीन आवर्तने होऊ शकतात. प्रत्येक वर्षी चांगला पाऊस होईल. धरण भरेल. असे नाही. धरण जेवढे कमी भरेल. तेवढी सिंचनाच्या पाण्यात कपात होते. धरणसाठा १८ टीएमसी राहिला. तर, एकच आवर्तन होऊ शकते. त्यामुळे, सिंचनाचे पाणी पुनर्स्थापित करणे काळाची गरज आहे.
हे वापरतात मुळाचे पाणी
पिण्याचे पाणी - नगर शहर, राहुरी व देवळाली नगरपालिका, बारागाव नांदूरसह १४ गावे पाणीयोजना, कुरणवाडीसह १९ गावे पाणी योजना, बुऱ्हाणनगरसह व मिरी तिसगाव पाणी योजना.
औद्योगिक वसाहत - अहमदनगर, सुपे, पांढरीपूल.
सिंचनासाठी - डाव्या कालव्यातून राहुरी तालुक्यातील १० हजार हेक्टर, उजव्या कालव्यातून राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील ७३ हजार हेक्टर, वांबोरी चारीतून नगर तालुका, राहुरी, नेवासे व पाथर्डी तालुक्यातील १०२ तलावांत पाणी सोडले जाते. भागडा चारीतून ८ जिरायत गावांतील ६० तलाव.
शहरे वाढतात, त्यामुळे पाणीमागणी वाढते. औद्योगिक वसाहतींतून कंपन्यांची वाढती मागणी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.