शेवगाव (जि. नगर) : ग्रामीण भागात गावोगावी सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे. वाड्या-वस्त्यांवरही देशी-विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोलिसांची मात्र याकडे डोळेझाक होत आहे.
तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या-वस्त्यांवर अवैध देशी-विदेशी दारूविक्रीचा धंदा तेजीत आहे. मागणी वाढल्याने व मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने, या व्यवसायात युवक, बेरोजगार, भांडवलदार नव्याने उतरू लागले आहेत. शहरातील या व्यवसायातील व्यक्तींनी गावोगावी बेरोजगारांना हेरून त्यांना ठोक व किरकोळ विक्रीसाठी पुढे केले आहे. शहरातून दुचाकीवर व चारचाकीतून पार्सल रोज पोच करून किरकोळ विक्री करण्यासाठी ठरावीक जागा नेमून दिल्या आहेत. गावातील किमान दोन-तीन ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारू सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे मजूर, बांधकाम व्यावसायिक, वाहनचालक, वाळूतस्कर अशा अनेक व्यवसायांतील कमी वयाची मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत.
दिवसभर अंगमेहनतीची कामे करणारे अनेक जण दारूच्या व्यसनामुळे बरबाद झाले असून, त्यांचे कौटुंबिक सौख्य हरवले आहे. व्यसनाधिनतेमुळे चोरी, लुटमार, विनयभंग, महिलांवर अत्याचार यांसारख्या घटनांतदेखील वाढ झाली आहे. ठाकूर निमगाव, मजलेशहर येथील संतप्त महिलांनी थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, अद्याप तेथील दारूविक्री बंद झालेली नाही. त्यामुळे अवैध दारूविक्रीबरोबरच गुन्हेगारी फोफावण्यास एक प्रकारे पोलिसच प्रोत्साहन देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया : गावातील अवैध दारूविक्री बंद व्हावी, यासाठी वेळोवेळी पोलिसांना निवेदने दिली. मात्र, तरीदेखील गावातील दारूविक्री बंद झालेली नाही. तालुक्यात सुरू असलेला हा अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा महिला त्यांच्या पद्धतीने दारूविक्रेत्यांचा बंदोबस्त करतील.
- सीमा मडके, तालुकाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शेवगाव
ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने पथके तयार केली आहेत. ग्रामस्थांनी अवैध दारूविक्रीची माहिती या पथकांना दिल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल.
- सुदर्शन मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी, शेवगाव
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.