अकोला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीसाठी अकोलेकरच जबाबदार असल्याचे वक्तव्य करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोलेकरांचा अवमान केला आहे. त्यांनी अकोलेकरांना दोष देण्याऐवजी कागदोपत्री काम करणाऱ्या प्रशासनावर पकड मजबूत करावा, असा सल्ला भाजपच्या वतीने देण्यात आला आहे.
अकोलेकरांचा अपमान करण्याचा प्रकार कोणी करू नये. जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग यांचा आपसात समन्वय नाही. उपाययोजना करण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यात कागदोपत्री कार्य करण्यात अधिकारीवर्ग गुंगतला आहे. त्यामुळे प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पालकमंत्र्यांनी अकोलेकरांना दोष देण्याचे ऐवजी या प्रशासनावर आपली पकड मजबूत करावी. सरकारचा आदेश जर अधिकारी ऐकत नसेल ही दुर्देवी बाब असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केली. अकोलेकर हे संयमशील व सर्व कामांमध्ये सहकार्य करणारे आहे. पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल विभाग व मनपा प्रशासन एकत्र येऊन कार्य करत नाही, तोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणे नाही. रोज निर्णय बदलणे हा नियम प्रशासनाचा झाला आहे. हॉस्पिटलमध्ये व्यवस्था नाही. कृषी विद्यापीठ भागांमध्ये योग्य ती व्यवस्था नाही, नियोजन नाही. त्यामुळे रुग्णांमध्ये दहशतीचं वातावरण असून, शासनाचे पैसे कुठे खर्च होत आहे याचा पत्ता लागत नाही. यंत्रणा असताना त्यांच्याकडून काम करून घेण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे, असा ठपका आमदार शर्मा यांनी ठेवला आहे.
जनतेची साथ का मिळाली नाही याचे आत्मपरीक्षण करा
जनता कर्फ्यू जनतेची साथ का मिळाली नाही याचे चिंतन करण्याची गरज आहे. आत्मपरीक्षण करून यासंदर्भात उपाययोजना करू अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची गरज आहे. यासाठी नोडल ऑफिसर राज्य शासनाने नियुक्त करावा. सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये जागा भरून त्वरित सुरू करण्यात यावे. यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शासनाकडे यासाठी दबाव निर्माण करावा व अकोलेकरांना योग्य सेवा अधिकारी देत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निर्णय घ्यावा. पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन केवळ गप्पांचा अड्डा झाला आहे. वृत्तपत्र, लोकप्रतिनिधी वारंवार या विषयावर सूचना देत असतानासुद्धा त्यावर अंमलबजावणी करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. याचा सुद्धा विचार करून निर्णय घेऊन जनतेमध्ये विश्वास निर्माण करीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यादृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.